पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

By admin | Published: September 29, 2014 01:01 AM2014-09-29T01:01:59+5:302014-09-29T01:01:59+5:30

५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली आहे. दीक्षाभूमीवरील तयारी पूर्ण झाली असून प्रशासनासोबत सामाजिक संघटना व कार्यकर्तेही दरवर्षीप्रमाणे

Panchal Flag with Sajali Dikshitabhoomi | पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

Next

धम्मचक्र प्रवर्तन : प्रशासनासह सामाजिक संघटनाही सेवेसाठी सज्ज
नागपूर : ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली आहे. दीक्षाभूमीवरील तयारी पूर्ण झाली असून प्रशासनासोबत सामाजिक संघटना व कार्यकर्तेही दरवर्षीप्रमाणे सेवेसाठी सज्ज झाले आहेत. अशोक विजयादशमीला पाच दिवस असून तयारीबाबत शेवटच्या हात फिरवणे सुरू आहे. देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी सामाजिक संघटनाही सज्ज झाल्या आहेत.
२४ तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून दीक्षाभूमी परिसरात ३०० अस्थायी नळ लावण्यात आले आहेत. याशिवाय टँकरचीही सोय करण्यात येणार आहे. याशिवाय ७०० शौचालये आणि १०० स्नानगृहांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेची स्वतंत्र कंट्रोल रूम
दीक्षाभूमीवर विविध विभागांच्यावतीने कामे केली जात आहे. सर्वाधिक कामे महापालिकेच्या अधिकारांतर्गत येतात. पाणी, स्वच्छता, परिवहन आदी कामे महापालिका पाहात असते. ही कामे व्यवस्थित सुरू आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी यंदा माहापलिकेचे स्वतंत्र कंट्रोल रूम दीक्षाभूमीवर उभारण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलीस कंट्रोल रूममधून त्यावर देखरेख केली जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाईल. याशिवाय परिसरात ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात करण्यात आले असून त्यावरूनच दुर्बिणीच्या साहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
साफसफाईसाठी २४ तास कर्मचारी
दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची वर्दळ असते. त्यांच्यासाठी भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा स्वयंसेवी संघटनांतर्फे केली जाते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचून अस्वच्छता पसरत असते. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २ ते ४ सप्टेंबर पर्यंत दीक्षाभूमीवर २४ तास सफाई कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. परिसरात कुठेही कचरा साचता कामा नये. याची संपूर्ण जबाबदारी मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे आणि अन्न निरीक्षक सुधीर फटिंग यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अस्थायी पोलीस नियंत्रण कक्ष
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात अस्थायी पोलीस नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. दीक्षाभूमीच्या चारही बाजुंनी वॉच टॉवर उभारले आहेत.
हायमास्ट लाईटचे टॉवर
मुख्य समारंभास्थळी लख्ख प्रकाश राहावा या उद्देशाने मुख्य समारंभाच्या कार्यक्रम परिसरात चारही बाजूंनी चार मोठे हायमास्ट लाईटचे टॉवर उभारण्यात येत आहे.
सर्व विहारांनी एकाचवेळी बुद्ध वंदना घ्यावी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी सकाळी ९ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेतली होती. त्याची स्मृती म्हणून दीक्षाभूमीवर दरवर्षी सकाळी सामूहिक बुद्धवंदना घेतली जाते. यंदासुद्धा ती घेण्यात येईल. तेव्हा शहरातील सर्व बुद्ध विहारांनी त्या दिवशी एकाच वेळी बुद्ध वंदना घ्यावी, अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी केली आहे.
आपली पादत्राणे सांभाळावी
धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग असते. यंदा रस्त्यावरील मुख्य गेटवरच पादत्राणे ठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा जनतेने सहकार्य करावे, शक्यतोवर आपली पादत्राणे स्वत:च सांभाळावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Panchal Flag with Sajali Dikshitabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.