पंचनामा - गजर की गाजर..?

By admin | Published: February 18, 2017 02:01 AM2017-02-18T02:01:00+5:302017-02-18T02:01:00+5:30

नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकर थरथरत्या आवाजात ‘टू बी आॅर नॉट टू बी... जगावं की मरावं... हा एवढा एकच प्रश्न

Panchnama - the carrot of the alarm ..? | पंचनामा - गजर की गाजर..?

पंचनामा - गजर की गाजर..?

Next

नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकर थरथरत्या आवाजात ‘टू बी आॅर नॉट टू बी... जगावं की मरावं... हा एवढा एकच प्रश्न आहे...’ असा भारदस्त संवाद म्हणायचे तेव्हा ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे रहायचे..! हल्ली असे रोमांचकारी संवाद अंमळ कमीच तयार होतात. त्यातही निवडणुकीचा मौसम आला की संवाद इतके वाढतात की कधी कधी शब्दही अपुरे पडायला लागतात... तेव्हा कार्यकर्ते, समीक्षक फळं, भाज्या, प्राणी यांचा आधार घेतात. कधी कधी असे आधार चपखल बसतात, तर कधी त्यातून नको ते अर्थही निघतात... या निवडणुकीत असेच काही घडले. काही धमाल आश्वासने देऊन भाजपा केंद्रात सत्तेवर आली. त्याच प्रभावाखाली राज्याच्या निवडणुका झाल्या तेव्हा देखील ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..’ या जाहिरातीने प्रभाव पाडला. सत्तापरिवर्तन झाले. पण केंद्र आणि राज्यात दोन ते तीन वर्षे उलटली तरीही आश्वासने काही पूर्ण होत नाहीत हे पाहून विरोधकांनी या आश्वासनांवर टीका करणे सुरू केले. कितीही टीका केली तरीही सरकारवर काही परिणाम होईना आणि विरोधकांचे शब्दभंडार रिकामे होऊ लागले तसे मग टीकेसाठी भाज्या, फळं यांची मदत घेतली जाऊ लागली. त्यातून भाजपाचे आश्वासनांचे गाजर असा शब्द पुढे जोराने आला. सोशल मीडियाच्या कृपेने हे गाजर घराघरात पोहोचले. एवढेच नाही तर मुंबईत भाजपाच्या एका प्रचार सभेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताक्षणी पोतं भरुन गाजर आणून वाटली. असाच किस्सा अकोल्यात घडला. तेथे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी शेतकरी संघटनेने गाजरं आणून फुकटात वाटप केली. सडकी अंडी, टोमॅटो फेकून सभांमध्ये निषेध करण्याची जागा गाजर वाटपाच्या अभिनव आंदोलनाने घेतली आणि पाहता पाहता गाजराचा भाव वधारला.
प्रचाराच्या या काळात कोणी गाजरं विकत आणून देतो म्हणाले तरी लोक त्याला भाजपाचा प्रचार करतोयस का? असे विचारु लागले. कार्टूनकार देखील गाजराची अनेक रुपं चितारु लागली. आश्वासन किती जूने आणि किती महत्वाचे हे पाहून कार्टूनमधल्या गाजरांचे आकार ठरु लागले. तर भाजपाच्या सभेत फूकट गाजर वाटप करणाऱ्या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करायचे याची चाचपणी सुरु झाली. कोणी तरी सांगितले की भादंवि कलम १७१ यासाठी लागू होऊ शकते. तर कोणी त्यातील १७१ जी हे कलम तर खोटी आश्वासने देणाऱ्या प्रत्येकाला लागू होऊ शकते असे सांगून टाकले.
परिणामी सध्या राज्यभर गाजराचा गजर सुरु झाला. याचा तीव्र प्रभाव भाजपाच्या महिला मोर्चाचे पोस्टर बनविणाऱ्या एका आर्टीस्टवरही झाला. त्याने मग हे वास्तव आपल्या पोस्टरवर शब्दबद्ध केले. भाजपाने निवडणुकीच्या निमित्ताने महिला प्रचार दिवसाचे आयोजन केले होते. त्याच्या पोस्टरवर (४ वाजता होणार सुरुवात ‘‘स्त्रीशक्तीच्या गाजराची’’) असे छापून टाकले गेले. अर्थात स्त्रीशक्तीच्या गजराची सुरुवात असे हवे होते. पण आता गाजराची नाही गजराची हे कितीही गजर करुन सांगितले तरी कोणाला खरे वाटेना हे सांगता सांगता भाजपा नेत्यांची पुरेवाट झालीय. काहींनी तर शिवसेनेनेच हे असले बनावट पोस्टर बनवून आमची बदनामी केलीय असाही दावा केलाय. काही असो, गाजरांना चांगले दिवस आल्याने काहींनी गाजर एक गरज, असा अभ्यासपूर्ण विवेचनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची खबर आहे. भाजपाने पत्रकार परिषदेनंतरच्या जेवणाच्या मेन्यूमधूनही यंदा गाजराचा हलवा काढून टाकल्याची माहिती आहे...
- अतुल कुलकर्णी -

Web Title: Panchnama - the carrot of the alarm ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.