पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:47 PM2020-06-12T17:47:45+5:302020-06-12T17:49:38+5:30

पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर...

Pandhari Wari is the happy world of Waraks! | पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

googlenewsNext
ठळक मुद्देसंत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त संवाद...

 नम्रता फडणीस -
पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व आहे. पंढरीचा पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा चित्सूर्य आहे. चैतन्याचा प्रासादिक स्त्रोत आहे.'ज्ञानोबा-तुकोबा' ही त्या विश्वाची उर्जा आहे. सर्वांभूती भगवदभाव हा त्या विश्वाचा धर्म आहे. अखंड भजन, नामस्मरण आणि संकीर्तन ही त्या विश्वाची श्रृती आहे. तर वारकऱ्यांचा स्नेहभाव हीच स्मृती आहे. प्रेमभक्ती हेच त्याचे चैतन्य आहे. अद्वैतानुभूती हीच त्या विश्वाची चितशक्ती असून, अहंकार विरहीत कृती होऊन स्वत:ला विसरणे हीच मुक्ती आहे. ज्ञान आणि प्रेम हा श्वास आहे तर चिदानंद हा त्याचा ध्यास आहे. हे चिंतन आहे, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी साक्षात याचि देही याचि डोळा अनुभूती घेणारे संत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या (१२ जून) श्रीक्षेत्र देहूतून आणि परवा (१३ जून) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. त्यानिमित्त 'लोकमत' ने त्यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त साधलेला हा संवाद.

महाराष्ट्राच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे, त्याविषयी काय सांगाल?
 - पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे वारी आहे. अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर एकदा तरी वारी अनुभवायला हवी.

इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या वारीला प्रारंभ कधी झाला?
- महाराष्ट्राच्या वारीची परंपरा किमान हजार वर्षांपासूनची आहे. वारीच्या दोन परंपरा आहेत. एक म्हणजे पंढरपूरची पायी परंपरा आणि दिंड्या पताकांसह पालखीची परंपरा. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनीदेखील पायी वारी केल्याचा उल्लेख आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक' , असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. संत तुकाराम महाराजदेखील वारी करायचे. त्यांच्याकडे ४२ पिढ्यांची परंपरा आहे. तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांनी या सोहळ्याला पालखीचे सुंदर स्वरूप दिले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची ही परंपरा सुरू केली. हा १६८० पासून सुरू झालेला संयुक्त पालखी सोहळा १८३५ पर्यंत कायम होता. त्यानंतर हैबतबाबा आरफळकर जे शिंदे सरकाराच्या पदरी सरदार होते. त्यांनी स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या संस्थानिकांकडून मदत मागितली. असा त्याचा इतिहास आहे.

पंढरपूरच्या वारीत पांढरी पताका फडकवली जाते, त्यामागचे कारण काय?
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुणे नगर वाचन मंदिर येथून पालखी सोहळा जाताना पाहायचे. हे वारकरी एकरूप होऊन नाचत आहेत, हे पाहून ते भारावून जायचे. वारीत सहभागी होणाºया विविध संतांच्या पालखींबद्दल त्यांनी लेखन केले. त्यात संत कबीरांच्या पालखीचाही समावेश होता. देहू संस्थानने काढलेल्या पुस्तिकेतही त्याचा उल्लेख आहे. मधल्या काळात विविध ठिकाणाहून पालख्या घेऊन येणे शक्य नसायचे. तेव्हा संत कबीर यांच्या अनुयायांनी कबीरांचे प्रतीक म्हणून हा पांढरा झेंडा त्यांनी पालखी सोहळ्यात दिला. पालखीत भगव्या पतकांबरोबर ही पांढरी पताका म्हणून फडकवली जाते.

वारीमध्ये विविध प्रतीके समाविष्ट करण्यात आली आहेत. ती का?
- वारीमध्ये भजनाबरोबरच भारूड, संकीर्तन, धाव, फुगडी आहे. या वाटचालीला एक संत खेळाचे रूप दिले आहे. काही उभी रिंगण केली जातात. रिंगण म्हणजे एक वर्तुळ. जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून जीवरूप बिंदूपासून निघायचे आणि व्यापक शिवरूपाला वळसा घालून पुन्हा जीवरूप अवस्थेच्या बिंदूपाशी जायचे. त्यातून जीवनाचे रिंगण पूर्ण होते.
 

Web Title: Pandhari Wari is the happy world of Waraks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.