पंढरपूरच्या ‘बिली बायडेन’ने दिला शीर्षासन करून वाईड बॉल!, इंग्लंडचा मायकल वॉन झाला फॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:16 AM2021-12-12T06:16:31+5:302021-12-12T06:17:23+5:30
वॉनने केला व्हायरल व्हिडीओ केला शेअर, पाहा व्हिडीओ
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपुरातील स्थानिक अम्पायर दीपक नाईकनवरे यांचा शीर्षासन करून वाईड बॉलचा निर्णय देतानाचा अनोखा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की तो इंग्लंड क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मायकल वॉन यांच्यापर्यंत पोहोचला. तो पाहिल्यानंतर त्यावर मत व्यक्त करण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही. त्यामुळे पंढरपूरच्या दीपकचे नाव क्रिकेटच्या विश्वात जगभरात चर्चेत आले आहे.
क्रिकेट खेळामधील बॉलर, बॅटस्मन, विकेटकिपर, फिल्डर व अम्पायरचेदेखील अनेक जण चाहते असतात. त्याच पद्धतीने पंढरपुरातील अम्पायर दीपक नाईकनवरे उर्फ डीएन रॉक यांचे सोशल मीडियाद्वारे चाहते निर्माण झाले आहेत. त्याने एका सामन्यादरम्यान वाईड बॉलचा निकाल वेगळ्या पद्धतीने दिला. पुरंदर प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान गोलंदाजाने वाईड चेंडू टाकला तेव्हा त्याने डोक्यावर उभे राहात (शीर्षासन) दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरत निर्णय दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो मायकल वॉन यांच्यापर्यंत पोहोचला. तो पाहून वॉनदेखील दीपकचे फॅन झाले. त्यांनी व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला.
Surely we need to see this chap join the ICC Elite panel .. 👍🙌🙌 pic.twitter.com/FcugJBgOEn
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 5, 2021
मी प्रसिद्ध अम्पायर बिली बायडेन यांचा फॅन आहे. त्यांना पाहून मला वेगळ्या स्टाईलने अम्पायरिंग करण्याची प्रेरणा मिळाली. कोरोना काळात टेन्शनमध्ये असणाऱ्या लोकांना हसविण्याचे काम यानिमित्ताने करीत आहे. याचे मला समाधान वाटते.
दीपक नाईकनवरे, अम्पायर, पंढरपूर