पंढरपूरात पूर परिस्थिती ; अनेक मंदिरे पाण्याखाली, व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:39 PM2017-09-15T16:39:37+5:302017-09-15T16:42:55+5:30
१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : उजनीतून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून ४५ हजार क्युसेक असे एकूण १ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़
उजनी धरणातून १४ सप्टेंबर रोजी ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून ४५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे़ त्यामुळे भीमा नदीत सध्या १ लाख १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे़ तसेच उजनी धरण व पंढरपूर तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे.
सध्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून घाटाना पाणी लागले आहे. भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहरासह नदी काठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
धोकादायक स्थितीत भाविकांचे स्नान
भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे़ अशी स्थिती असतानाही नदीपात्राजवळ प्रशासनाने कोणतीच यंत्रणा लावली नाही़ पूर परिस्थिती असतानाही भाविक स्नानासाठी नदीत उतरू लागल्याने धोका वाढला आहे. काही भाविक घाटापासून दूर नदी पात्रात जाऊन स्नान करीत आहेत़ मात्र वेगाने पाणी वाहत असल्याने भाविकांना स्नानापासून रोखणे गरजेचे आहे. शिवाय भीमा नदीवर प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे़