विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:39 AM2018-05-06T05:39:04+5:302018-05-06T05:39:04+5:30
गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.
- सचिन कांबळे
पंढरपूर : गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.
एका भाविकाने २१ लाख रुपयांची देणगी देऊन विठ्ठलाप्रती आपली भक्ती दाखविली तर गोशाळा सुधारणेसाठी ३५ लाख रुपये, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपावरील समितीचे नाव दुरुस्ती करण्याची जबाबदारी मंगळवेढ्यातील एकाने घेतली आहे. आर. डब्लू प्रमोशन कंपनीच्या सहाय्याने वाळवंटात चेजिंग रुम करण्यात येणार आहे. नामदेव पायरीचे सुशोभीकरण करण्याबरोबरच दुसºया एका उद्योजकाने चांदीची थाळी दिली. तीन भाविकांनी १ लाख रुपये व पाच भाविकांनी ५० हजार रुपयांची देणगी मंदिर समितीला दिल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. एका भाविकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर १ मे रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २१ लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
ही दिली जाते सेवा
ंविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अन्नछत्रातून प्रसाद सेवा, वाळवंटामध्ये चेजिंग रूम, दर्शन रांगेत बॅरिकेटिंग, मंदिर व परिसराची स्वच्छता, एकादशी कालावधीत भाविकांना चहा, शुध्द पाणी मोफत देणे या सेवा देण्यात येत आहेत.
भाविकांना सुविधा पुरविण्याचे काम योग्य पध्दतीने सुरु आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला देणगी देणाºया भक्तांमध्ये वाढ झाली आहे.
- सचिन अधटराव,
सदस्य, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर