विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; लेखापरीक्षण अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:50 AM2023-12-13T10:50:18+5:302023-12-13T10:50:59+5:30
या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती'चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून लाडू प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू करण्याचे काम बचत गटाला देण्यात आले होते. बचत गटाकडून ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात, ती जागा अस्वच्छ आहे. तसंच लाडू सुकवण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे.सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते. निकृष्ट दर्जाचा लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
याचबरोबर, लाडूच्या पाकिटावर जे घटक नोंदवले जातात, ते वापरले जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तीन लाडूंचे पाकीट २० रुपयांना विकले जाते. मात्र, या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. होणाऱ्या परिणामास लाडू बनवणाऱ्या बचत गटाबरोबर मंदिर समितीची सुद्धा तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.
दुसरीकडे, विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू आता राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणित करून घेत आहोत. त्यामुळे प्रसादामध्ये ज्या काही त्रुटी अहवालात नोंदवल्या आहेत, त्या आता राहणार नाहीत, असे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले आहे.