पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 07:57 PM2019-07-09T19:57:59+5:302019-07-09T20:19:22+5:30

पंढरपुर तालुक्यातील टप्पा येथे बंधू भेट होणार असल्याने माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

pandharpur wari 2019 :Dnyanoba and Sant Sopan Dev Maharaj brothers were meet in Palkhi festival | पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश 

पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश 

googlenewsNext
ठळक मुद्देअश्वांच्या तीन फेऱ्यानंतर तिसरे गोल रिंगण पूर्ण दही, धपाटे, चटणी, पिठलं भाकरी, ठेचा, कर्नाटकी भात, कापणी, माडग आदी पदार्थांचा आस्वाद माऊली माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुगांच्या तालाने अनेकांचा कंठ आला दाटून बंधू भेटीचा अनोखा सोहळा पाहताना वैष्णवांना अश्रू अनावर

- अमोल अवचिते-  
भंडीशेगाव : ज्ञानोबा माऊली, माऊली, माऊलीच्या जयघोषात  टप्पा येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेटीने पालखी सोहळा भावविवश झाला. माळशिरस तालुक्यातुन पंढरपूर तालुक्यात माऊलींच्या पालखीन मंगळवारीे प्रवेश केला.
   वेळापुर मुक्कामानंतर माऊलींची पालखी भंडीशेगावकडे मार्गस्थ झाली. पहिला विसावा घेत ठाकुरबुवाची समाधी येथे तिसऱ्या गोल रिंगण सोहळा रंगला. 
 यावेळी भक्तांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. अश्वांच्या तीन फेऱ्यानंतर तिसरे गोल रिंगण पूर्ण झाले. 
     तिसऱ्या विसाव्यासाठी आणि भोजनासाठी तोंडले बोंडले येथे नंदाचा ओढ्यातून माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन बोंडले गावात आणण्यात आली. यापूर्वी ओढ्यातून पालखी जात असे. कालांतराने त्यावर पूल बांधला गेला. परंपरा म्हणून पालखी खांद्यावर आणली जाते. पुलावर यावेळी माऊलींच्या पालखीवर सुगंधित पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात वारकरी भिजण्याचा, स्नानाचा आनंद घेत होते. वैष्णव भजन म्हणत नाचत होते. तर काहींनी फुगड्यांचा फेर धरला.  दुपारच्या भोजनासाठी बोंडले गाव आणि शेजारील गावातील भक्त माऊलींसाठी नैवेद्य घेऊन आले होते.  प्रसाद  एकमेकांना वाटप करून भोजन करत होते. दही, धपाटे, चटणी, पिठलं भाकरी, ठेचा, कर्नाटकी भात, कापणी, माडग
आदी पदार्थांचा आस्वाद यावेळी वैष्णवांनी घेतला. श्री कृष्णाने याच ओढ्यावर गोपाल काला केल्याची आख्यायिका सांगितली जाते. 
   पंढरपुर तालुक्यातील टप्पा येथे बंधू भेट होणार असल्याने माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पाच वाजता माऊलींचा रथ टप्पा येथे आला.  काहीवेळाने माऊलींच्या रथाशेजारी सोपानदेवांचा रथ येताच माऊली माऊलीच्या जयघोषात श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
 बंधू भेटीचा अनोखा सोहळा पाहताना वैष्णवांना अश्रू अनावर होत होते. माऊली माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुगांच्या तालाने अनेकांचा कंठ दाटून आला होता. 
  एकूणच भेट सोहळा भावविवश झाला होता. पंढरपूर तालुक्यात ज्ञानोबा, तुकोबा पालखी सोहळ्यासह इतर संताचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे मार्गावर वैष्णवांची गर्दी दिसून येत असली तरी त्यात शिस्त असल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास मदत होत आहे. 
भंडीशेगाव मुक्कामानंतर बाजीरावाची विहीर येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण होणार आहे.  (आज )बुधवारी वाखरी येथे पालखी मुक्कामी असणार आहे.

Web Title: pandharpur wari 2019 :Dnyanoba and Sant Sopan Dev Maharaj brothers were meet in Palkhi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.