Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:53 AM2021-05-29T10:53:38+5:302021-05-29T10:54:04+5:30
Pandharpur Wari: कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच वारीची ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे : महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पालखी सोहळा यंदा निघावा की नाही, या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.
दरवर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांची, तर देहूगावातून तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. राज्यभरातले हजारो वारकरी या दोन्ही पालखी सोहळ्यांमधल्या शेकडो दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आषाढी वारीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे प्रमुख व ज्येष्ठ वारकऱ्यांनी यावेळी काही अटी-शर्तींसह पायी पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी, यासाठी प्रचंड अग्रह धरला. मात्र राज्यात पहिल्या लाटेपेक्षा सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. गर्दी झाल्यानंतर कोरोना आटोक्याबाहेर जातो, याची राज्यात आणि देशात अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तरीदेखील वारीसंदर्भात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य अधिकारी ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांना पवार यांनी सांगितले की, सर्व विश्वस्त व वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी आग्रही आहे. मात्र, आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की जिथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.