Pandharpur Wari: 'पंढरपूर वारी'ला जागतिक वारसा? केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवणार प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 08:15 AM2023-06-30T08:15:50+5:302023-06-30T08:18:20+5:30
Pandharpur Wari: पंढरीच्या वारीचा इतिहास तेराव्या शतकाच्या आधीपासून ज्ञात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंत २५० कि.मी. अंतराच्या वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे.
- सुनील चावके
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे आराध्य दैवत ठरलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची उपासना करणाऱ्या वारीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याची मागणी करणारा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वतीने येत्या दोन ते तीन महिन्यांत युनेस्कोकडे सादर करण्यात येणार आहे.
पंढरीच्या वारीचा इतिहास तेराव्या शतकाच्या आधीपासून ज्ञात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंत २५० कि.मी. अंतराच्या वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. याशिवाय वारीशी संबंधित सर्व साहित्य एकत्रित करण्यात येत असून पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये प्रस्ताव युनेस्कोला पाठविण्यात येईल, अशी माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी 'लोकमत'ला दिली.