पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल- संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:01 PM2021-07-01T12:01:40+5:302021-07-01T12:03:30+5:30
पायी वारीला परवानगी द्या; संभाजी भिडेंचं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सांगली: पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे, तर जगातील कोरोना आटोक्यात येईल, नामशेष होईल, असं विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आषाढी वारीसाठी संभाजी भिडेंनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. वारी करण्यास परवानगी देण्याचं आवाहन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केलं. पंढरपूरच्या वारीनंतर जगातील करोना नामशेष होईल असं संभाजी भिडे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
“पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील कोरोना नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी,” अशी विनंती संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. “आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त व्हावा असं वाटतं आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी,” असंही ते पुढे म्हणाले.
संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्या करणारे लाखो वारकरी असून वर्षानुवर्षे ही परंपरा सुरु असल्याचं म्हटलं आहे. “गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु वर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत,” असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.
“चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असं आश्वासन दिले होतं. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आलं आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
“शासनाकडून वारकर्यांचा विश्वासघात झाला असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आलं आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे,” असंही ते म्हणाले आहेत.