पंतप्रधान नरेंद्र मोदींना सैनिक फ्लॅग लावण्याचा पंढरपूरच्या वीरकन्येला मिळाला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:34 PM2019-12-07T16:34:47+5:302019-12-07T16:43:41+5:30
पुण्यात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ; पंढरपुरचे सुपुत्र शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबियांना निमंत्रण
पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपुरचे सुपुत्र शहिद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी राजभवन, पुणे येथील भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रमाचे निमित्ताने करण्यात आला.
पुणे येथे आजपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौºयावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण बोर्डचे कर्नल राजेंद्र जाधव व सहकारी, वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो.