पंढरीची वारी होणार निर्मल वारी
By admin | Published: June 24, 2016 02:22 PM2016-06-24T14:22:43+5:302016-06-24T14:26:09+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यावर्षी ‘ निर्मल वारी’ म्हणून ओळखला जाणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २४ :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यावर्षी ‘ निर्मल वारी’ म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी पालखी मार्गावर वारक-यांसाठी शासन व सामाजिक सेवा संस्थेच्या मदतीने प्री-फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून या उपक्रमामुळे वारी निर्मल व सुंदर होणार असल्याचे मत विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीच्या नियोजन व कामांचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकित ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे, प्रांतधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे, तहसिलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,कार्यकारी अभियंता एस.टी राऊत, मुख्यधिकारी अभिजित बापट, शंकर गोरे, एस.टी चे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, तालुका पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, जलसंपदा विभागाचे श्री.पडघमल उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हणाले, संपुर्ण पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारक-यांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 500 तर संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये 300 शौचालय उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीची देखील मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या आपत्ती प्रतिसाद प्रणालीची यंत्रणा इतर जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आरखड्यातून मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ पुर्ण करण्यात येतील. शहरात सी.सी.टीव्ही. यंत्रणा उभारण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून तांत्रिक बाबी तपासूण निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच भंडीशेगांव, पिराची कुरोली व माळशिरस येथे पालखी तळांचे मुरमीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बैठकीत सफाई कामगारंच्या मागण्यांचा आढावाही घेण्यात आला.
तत्पुर्वी विभागीय आयुक्तांनी प्रशासनाकडून भाविकांना देण्यात येणा-या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यामध्ये 65 एकर ,पत्राशेड तसेच चंद्रभागा बसस्थानक, नवीन बसस्थानक येथे सुरु असलेल्या शौचालयाच्या कामांची पाहणी आवश्यक त्या सुचना संबंधितांना केल्या. यावेळी बैठकीत नगरपालिका, आरोग्य विभाग,सुलभ शौचालय प्रादेशिक परिवहन, एस.टी.महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबधित विभागाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी संबधित विभागाची अधिकारी उपस्थित होते.