विठ्ठल नामाने पंढरी दुमदुमली, अडीच लाख भाविकांनी घेतले विठ्ठलाचे मुखदर्शन
By Admin | Published: July 4, 2017 09:09 PM2017-07-04T21:09:43+5:302017-07-04T21:09:43+5:30
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या संत महंताच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्या बरोबरच थेट पंढरपूरला
>- शहाजी फुरडे-पाटील/ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 04 - पंढरीचा वास, चंद्रभागेत स्रान, आणिक दर्शन विठोबाचे हेचि मज घडो, जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे...
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या संत महंताच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांबरोबरच थेट पंढरपूरला दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरीतील रस्ते, मठ, वाळवंट विठ्ठल भक्तीने फुलून गेले होते, तर पंढरीत दाखल झालेल्या सुमारे सात ते आठ लाख वारकऱ्यांपैकी केवळ दीड लाख भाविकांनी विठ्ठलाचे पददर्शन व मुखदर्शन घेतले तर उर्वरित भाविकांनी पंढरीत वारी पोहचवून नगरप्रदक्षिणा पूर्ण करुन आपली वारी पोहचवली. दर्शनबारीत उभा राहून दर्शन घेणासाठी तब्बल तीस तासांचा कालावधी लागत होता..
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, पैठण येथून संत एकनाथ, मुक्ताईनगर हून संत मुक्ताबाई, शेगावचे गजानन महाराज, सासवडहून संत सोपानकाका आदी प्रमुख मानाच्या पालख्यांबरोबरच मराठवाडा, विदर्भ,खानदेश, सातारा,पुणे जिलबरोबरच मध्यप्रदेश व कर्नाटकातून देखील विविध संत महंताच्या पालख्या व दिंडी सोहळे आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला (दशमी ) पंढरीत दाखल झाले होते.
हे सोहळे पंढरीत दाखल झाल्यानंतर दिंड्यातील वारकरी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रात्री दाखल झाल्यानंतर पंढरपूरच्या परिसरात असलेल्या सुमारे पन्नास हजार तंबूसह विविध मठ,पासष्ट एकर परिसर व धर्मशाळांमध्ये रात्रभर विठूनामाचा गजर सुुरु होता. तर अनेक दिंड्यात भजन व किर्तने सुरु होती, पंढरीतील सर्व रस्यावर फक्त टाळ,मृदंगासह ज्ञानबा-तुकाराम ,विठ्ठल रखुमाई असा जयघोष सुरु होता.
वारकऱ्याचे चंद्रभागा स्रान,मंदिर प्रदक्षिणा...
पंढरपूरात पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या पाच ते सहा लाख भाविकांबरोबरच एसटी, रेल्वे, खाजगी वाहने आदींच्या माध्यमातून देखील सुमारे दोन लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते, यंदा चंद्रभागेत पाणी भरपूर असल्यामुळे आलेला वारकरी हा सुरुवातील चंद्रभागेत स्रान करुन महाद्वारात दाखल होत होऊन नामदेव पायरी व विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालून प्रसादाचे साहित्य घेऊन परतीचा प्रवास करीत होता.
पालख्यातील दिंड्यांची नगरप्रदक्षिणा....
संत तुकाराम असो की ज्ञानेश्वर माऊली या सर्व पालखी सोहळा व दिंड्यातून आलेले वारकरी मात्र चंद्रभागेत स्रान केल्यानंतर आपल्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांसह टाळकरी, कलश व तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला आंदीसह नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत होत्या, त्यामुळे दिंड्यातील भजनाने हा मार्ग अक्षरशा दूमदूमून गेला होता. या मार्गावरील संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर, संत तुकाराम मंदीर, तसेच एकनाथ मंदीरासमोर थांबून हे वारकरी भजन करीत होते. हे वारकरी नगरप्रदक्षिणा करुन व नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेऊनच वारी पूर्ण करतात.
गजानन महाराजांचे वारकरी दर्शनच घेत नाहीत...
शेगावहून आलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकरी हे हजार कि.मी. वरुन पायी चालत येतात, मात्र ते पाडूरंगाचे दर्शन करीत नाहीत, कारण त्यांना पाडूरंग त्यांच्या मठात येऊन दर्शन देतो अशी त्यांची धारणा आहे.
दोन दिवसात केवळ सव्वा लाख भाविकांनी घेतले पददर्शन...
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दर्शन रांगेतून विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी रांगेत उभे आहेत, दर मिनीटाला साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस भाविकांचे पददर्शन होत आहे, म्हणजे तासाला २७०० या नियमाप्रमाणे चोवीस तासात ६४८०० भाविक दर्शन घेत आहेत, याप्रमाणे दशमी व एकादशी या दोन दिवसात साधारपणे १ लाख २५ हजार भाविकांनी विठ्ठलाचे पददर्शन घेतल्याचे स्पष्ट होते तर दीड लाखाच्या जवळपास भाविकांनी मुख दर्शनाचा लाभ घेतला आहे. उर्वरीत सर्व वारकरी हे कळस, नामदेव पायरी व मंदीर प्रदक्षिणा पुर्ण करुन वारी पोहच केल्याच्या आनंदाने परतीच्या प्रवासाला लागतात. दर्शनबारीतील वारक-यांशी संवाद साधला असता त्यांनी 25 तासापूर्वी दर्शन रांगेत उभे राहिलो असल्याचे सांगितले.
सर्व संत पोर्णिमेपर्यंत पंढरीत...
या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संताच्या पालख्यांचा मुक्काम हा पोर्णिमेपर्यंत आपापल्या मठामध्ये असणार आहे, पोर्णिमेदिवशी गोपाळपूरचा काला झाल्यानंतर या सर्व पालख्या परतीच्या प्रवासाला लागणार आहेत, येताना लाखो वारकºयांसह आलेल्या या पालख्यात जाताना मात्र मानकरी व कांही निवडक वारकरी असतात, तसेच ते रोजचे अंतर देखील जास्त चालून कमी वेळात आपल्या गावी जातात.
- मागील दोन वारीमध्ये विठ्ठलाचे एका मिनिटाला साधारण पणे 50 ते 55 जणांचे दर्शन होत होते. यावर्षी मात्र ढिसाळ नियोजनामुळे मिनिटाला केवळ 40 ते 45 भाविकांचे दर्शन होत त्यामुळे अनेकांना या 15 ते 20 हजार भाविकांना दर्शना पासून मुकावे लागत आहे.