कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 12:57 PM2018-06-01T12:57:43+5:302018-06-01T12:57:43+5:30

फुंडकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी खामगावात जनसागर लोटला होता.

pandurang fundakars funeral in khamgaon | कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

Next

खामगाव-  महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात शुक्रवारी, १ जूनरोजी शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरून सकाळी ८ वाजता निघाली. टाळ मृदंगाच्या गजरात अटाळी येथील वारकरी यात सहभागी झाले होते. भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमानी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेन रोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगाव नाका, शेगाव रोडने मार्गक्रमण करीत सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११.३० वाजता अंत्ययात्रा पोहचली.

दरम्यान केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. जिल्ह्यातील शेतकरी बांधवासह भाजप प्रेमी व चाहते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पसमध्ये भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा पोहचल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, अथर्मंत्री सुधीर मुनगुंटीवर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, आमदार राहूल बोेंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार तुकाराम बिरकड, आमदार रायमुलकर यांच्यासह भाजप राज्य कार्यकारिणीतील ज्येष्ठ पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी, फुंडकर हे भाजपातील अजातशत्रु व्यक्तिमत्व होते. काळाने त्यांच्यावर झडप घालून आमच्यापासून हिरावले आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं गुरूवारी (ता. 31 मे) मुंबईतील के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या यांना बुधवारी सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रात्री त्यांची प्रकृती ठिक होती. पण रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यावेळी डॉक्टरही सोबत होते. पण हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

साधारणपणे वीस दिवस आधी भाऊसाहेब फुंडकर यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सकाळी दहा वाजता त्यांना के जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  पण रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सुनीता फुंडकर, मुलगा सागर  फुंडकर त्यांचे नजिकचे स्नेही अनिलभाई राजभोर तसेच अन्य नातेवाईकही हजर होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.
 

Web Title: pandurang fundakars funeral in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.