पंढरपूर-निजामाबाद रेल्वे लातूरकरांनी रोखली
By admin | Published: May 10, 2017 02:07 AM2017-05-10T02:07:05+5:302017-05-10T02:07:05+5:30
मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर रेल्वे स्थानकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव कृती समितीने पंढरपूर-निजामाबाद रेल्वे रोखली. आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता. या वेळी पोलिसांनी जवळपास २५५ आंदोलकांना ताब्यात घेतले.
मुंबई-लातूर एक्स्प्रेस ही लातूरकरांची अस्मिता आहे. लातूर रेल्वेलाइन अस्तित्वात आल्यापासून ही रेल्वे सुरू आहे. जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी वेटिंगवर असताना आणि रेल्वे फायद्यात असतानाही जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी ही रेल्वे बीदरला नेण्याचा घाट घातला. लातूरकरांची ओळख पुसण्याच त्यांचा डाव आहे. या निर्णयाला पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा. डॉ. सुनील गायकवाड हेही तेवढेच जबाबदार आहेत. हा निर्णय काही एका रात्रीतून झाला नाही. या निर्णयापूर्वी वर्ष-दीड वर्षापासूनची प्रक्रिया सुरू असावी. हा प्रकार होत असताना लातूरच्या खासदारांना माहिती नसावी, याबाबत आश्चर्य वाटते, असे आ. अमित देशमुख यावेळी म्हणाले.
अमित देशमुख चढले इंजिनावर...
पंढरपूर-निजामाबाद रेल्वे दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास स्थानकात दाखल झाल्यानंतर आमदार अमित देशमुख यांनी स्वत: इंजिनावर चढून मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. १५ मिनिट रेल्वे रोखल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.