पन्हाळगड ते विशालगड भ्रमंती एका दिवसात फत्ते
By Admin | Published: July 11, 2017 02:41 AM2017-07-11T02:41:31+5:302017-07-11T02:41:31+5:30
पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे. जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या ट्रेकमध्ये पावनखिंडीतील महापराक्रमाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
या मोहिमेबाबत ट्रेकर चंद्रकांत साटम यांनी सांगितले की, १२ जुलै १६६० रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले होते. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळच्या सुमारास महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले. या समर प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि ज्ञात व अज्ञात मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले होते. त्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून या ट्रेकचे आयोजन करत आहे. या भ्रमंतीदरम्यान मूळ इतिहासाला उजाळा दिला जातो. या वर्षी या वाटेवर ११ ते ५८ वयोगटातील तब्बल ७४ शिवप्रेमींनी एकदिवसीय पदभ्रमण केले. महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेत महाराष्ट्रासह हैदराबाद आणि दिल्ली या शहरांतील दुर्गप्रेमींनीही सहभाग घेतला होता. मोहिमेतील वैशिष्ट्य म्हणजे इतिहास जागवत सर्व दुर्गप्रेमी सलग २२ तास चालत राहिले. त्यामुळे दुर्गप्रेमींच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची चाचणी करणारी ही पदभ्रमण मोहीम होती.
छोट्या मावळ्यांनी लक्ष वेधले : एकूण ७४ दुर्गप्रेमींमध्ये याना कोकणे (११ वर्षे) आणि पालवी चव्हाण (१० वर्षे) या चिमुरडींनी ४० किमी अंतर गाठून पांढर पाणीपर्यंत पदभ्रमण केले. तर जिजाई कोकणे (१६ वर्षे) या तरुणीने पन्हाळगड ते विशाळगड हे अवघड अंतर सलग पदभ्रमण करत पूर्ण केले. ७४ दुर्गप्रेमींपैकी तब्बल ४१ सदस्यांनी संपूर्ण मोहीम फत्ते केली.
अवघ्या १९ तासांत
पूर्ण केली मोहीम
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी हा ट्रेक अवघ्या १९ तासांत पूर्ण केला. रघुवीर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेत सामील होत आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने ट्रेक पूर्ण करणे कठीण होते. अखेरच्या टप्प्यात वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे उत्साहात भर पडल्याने शेवटचे १६ किलोमीटर अंतर अवघ्या अडीच तासांत पार केले. अधिकाधिक युवा वर्गाने या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.