‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:24 PM2024-03-12T21:24:01+5:302024-03-12T21:27:00+5:30

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Pani Foundation will adopt digital method for 'Shetkari Chashak Award', Aamir Khan hinted | ‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

मुंबई - पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी झटणाऱ्या अभिनेता आमिर खानचे पाणी फाऊंडेशन डिजिटल मार्गाचा अवलंब करणार आहे. आमिर खानने याबाबतचे संकेत दिले आहेत. या मार्गाने पाणी फाऊंडेशन आपल्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकणार असल्याचेही आमिरने सांगितले आहे. पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे अलीकडेच पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकरी चषक २०२३ पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘पाणी फाऊंडेशन’ची सात प्रभावी वर्षे साजरी करत असल्याचे सांगताना आमिरने संस्थेच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेवर भर देत आमिर म्हणाला की, आम्ही या टप्प्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करीत पोहोचलो आहोत. यंदापासून तंत्रज्ञानाच्या वापराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

या वर्षी होणारी ही स्पर्धा डिजिटल पद्धतीने होणार असून, आम्हा सर्वांसाठी हे एक वेगळा अनुभव देणारी ठरेल. त्यात यशस्वी झाल्यास यंदा गटशेती राबवण्यात येईल. येत्या दोन वर्षांत प्रत्येक प्रदेशाशी जोडले जाण्याचे आणि प्रत्येक प्रदेशात गटशेती करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आमचे २० हजारांहून अधिक सदस्य सक्रियपणे समूह शेती करत असून या आकडेवारीत आणखी भर घालण्यास आणि कार्य सातत्याने चालू ठेवण्यास वचनबद्ध असल्याचेही आमिर म्हणाला.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियममध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात वेधक कार्यक्रमही सादर करण्यात आले. डॉ. पोळ यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगत एका प्रकारे कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.

Web Title: Pani Foundation will adopt digital method for 'Shetkari Chashak Award', Aamir Khan hinted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.