दहशतवाद्यांचा चेहरा उघड करेल घडयाळाचे ‘पॅनिक बटन’
By Admin | Published: July 3, 2016 09:27 PM2016-07-03T21:27:30+5:302016-07-03T21:53:16+5:30
दहशतवाद्यांचा खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी नाशिकच्या तरुणाने एक घड्याळ तयार केले असून, त्यातील ‘पॅनिक बटन’ दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे.
सतीश डोंगरे ,
नाशिक, दि. ३ : अब्जावधी लोकसंख्या असलेल्या जगात दहशतवाद्यांचा चेहरा ओळखणे कठीण होत असल्यानेच जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात दहशतवादी हल्ले घडवून निष्पापांचे बळी घेत आहेत. दहशतवादी केवळ विकसनशील राष्ट्रालाच निशाणा बनवित आहेत असे नाही तर, विकसित राष्ट्रांसमोरदेखील त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. अशा दहशतवाद्यांचा खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी नाशिकच्या तरुणाने एक घड्याळ तयार केले असून, त्यातील ‘पॅनिक बटन’ दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. या घड्याळाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केले असून, सुरक्षेकरिता हे घड्याळ जगाच्या कानाकोपऱ्यात फायदेशीर ठरेल, असे गौरवोद्गार काढले आहेत.
नाशिकरोड येथील रहिवासी असलेला आनंद सुंदरराज या तरुणाने दहशतवाद, वाढता भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा आदि मुद्द्ये अग्रस्थानी ठेवून एक हटके उपकरण विकसित करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने चेन्नई येथील आयटी कंपनीतील नोकरी सोडली. मोबाइलच्या जमान्यात सहज कोणालाही वापरता येईल असे उपकरण म्हणून त्याने घड्याळाची निवड केली. तब्बल पाच वर्ष यावर संशोधन केल्यानंतर त्याने एक आविष्कारिक घड्याळ विकसित केले आहे. हे घड्याळ आपत्कालीन परिस्थितीत ‘पॅनिक बटन’ दाबल्यास त्वरित कार्यान्वित होऊन व्हिडीओ, आॅडिओ स्वरूपात माहिती संकलित करून तत्काळ मदतीसाठी पोलीस यंत्रणा, सुरक्षा एजंन्सीज्, रुग्णालये, रुग्णवाहिका यांच्या सर्व्हरवर संदेश पोहचवून सतर्क करते.
आनंदराजने या घड्याळाचे पुणे येथे झालेल्या ‘मेक इन इंडिया’च्या कार्यशाळेत सादरीकरण केल्यानंतर आयोजकांनी त्याच्या या आविष्काराची थेट वॉशिंग्टन डिसी न्यूयॉर्क येथे झालेल्या ७० देशांच्या ‘इनोव्हेशन अॅण्ड इन्वेस्टमेंट समीट - २०१६’साठी निवड केली. या समीटमध्ये आनंदने आपल्या आविष्काराचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर सादरीकरण केल्यानंतर त्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले, तर अमेरिका, हॉलंड, बांगलादेश, सिंगापूर, कॅनडा, बुधापेस्ट व युरोपमधील काही देशांनी आनंदशी व्यावसायिक स्तरावर प्राथमिक चर्चादेखील केली. तसेच अमेरिका, भारत, सिंगापूर, कॅनडा यांच्यासह युरोपमधील तब्बल ३८ देशांनी आनंदच्या या घड्याळाचे पेटेंट मान्य केले असून, हे घड्याळ जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात सुरक्षेच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचे मान्य केले आहे.
सध्या आनंदराज त्याच्या घड्याळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्याच्या विचाराधीन असून, पंतप्रधान कार्यालयाकडून त्याला याबाबत विचारणा झाली आहे. लवकरच तो हे उपकरण सरकारच्या मदतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू इच्छितो.
सोने गहाण ठेवून अमेरिकेची वारी
या संशोधनाकरिता आनंदला आतापर्यंत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्यामुळे ‘इनोव्हेशन अॅण्ड इन्वेस्टमेंट समीटसाठी उपस्थित राहण्याकरिता त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. यावेळी त्याने पत्नीचे सोने व आपली चारचाकी गहाण ठेवून अमेरिकेची वारी केली. संशोधनासाठी बॅँकांनीदेखील आनंदला कर्ज देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. विदेशात संशोधनाला कर्ज दिले जाते. मात्र भारतात तशी पद्धत नाही. काही तारण ठेवण्यासाठी असेल तरच कर्ज दिले जाईल, असे आनंदला बॅँकांकडून सांगण्यात आल्याचे तो सांगतो.
आविष्कारिक घड्याळाचे फायदे...
घड्याळात स्मार्टफोन उपलब्ध असून, ‘पॅनिक बटन’ या घड्याळातील आविष्कार आहे. कारण हे बटन सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
जसे की, एखाद्या भागात आतंकवादी असल्याचे एखाद्या सामान्य नागरिकाच्या लक्षात आल्यास, त्याने हातावरील घड्याळाचे ‘पॅनिक बटन’ दाबावे. त्यानंतर आॅडीओ तथा व्हिडीओ असे दोन पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होतील. परिस्थितीनुसार पर्याय निवडल्यानंतर लगेचच तीस सेकंदांचा आॅडिओ किंवा व्हिडीओ तयार होतो व जवळच्या पोलीस तथा सुरक्षा एजंसीच्या सर्व्हरवर आपोआप धडकतो.
भ्रष्टाचाऱ्यांचा चेहरा उघड करण्यासाठी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची सुरक्षा व आपत्कालीन स्थितीतदेखील हे घड्याळ अशाच पद्धतीने फायदेशीर ठरते. या घड्याळाला नेटवर्कसाठी टॉवरची आवश्यकता भासत नाही. ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड’च्या (इएमएफ) आधारे घड्याळ सुरक्षा एजंसीज्, पोलीस रुग्णालय, अॅम्ब्युलन्स सेवा यांच्या सर्व्हरला आपोआप कनेक्ट होतो.
ज्या देशात हे घड्याळ वापरले जाईल (उदा. एखादा भारतीय अमेरिकेत गेल्यास) त्याठिकाणच्या इंटरनेट पॉलिसी यामध्ये आॅटोमॅटिक सेव्ह होतात. तसा प्रोग्रामच या घड्याळात सेट करण्यात आलेला आहे.
एखाद्याला व्यवस्थेविरोधात आवाज उठवायचा असल्यास (कॉमन मॅन व्हाईस) त्याने त्याचा आॅडिओ किंवा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावरील त्याच्या अकाउंटवर शेअर करण्याची सुविधादेखील या घड्याळात उपलब्ध आहे.
मी तयार केलेल्या घड्याळाचे जगात कौतुक होत असले तरी भारतात त्यास हवे तसे पाठबळ मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवसंशोधकांना चालना मिळावी यासाठी आम्ही आमच्या वित्तपुरवठ्याच्या पॉलिसींमध्येदेखील बदल करू शकतो, असे सांगितले. मग भारतातच अशी उदासीनता का? माझे संशोधन देशासाठी फायदेशीर ठरावे हाच माझा प्रयत्न असेल. - आनंद सुंदरराज, संशोधनकर्ता