पंकज भुजबळचीही होणार चौकशी
By admin | Published: February 5, 2016 04:05 AM2016-02-05T04:05:13+5:302016-02-05T04:05:13+5:30
सक्त वसुली संचालनालय (ईडी) पुढील आठवड्यात पंकज भुजबळला चौकशीसाठी बोलावणार आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार
डिप्पी वांकाणी, मुंबई
सक्त वसुली संचालनालय (ईडी) पुढील आठवड्यात पंकज भुजबळला चौकशीसाठी बोलावणार आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, समीर भुजबळ ज्या कंपन्यांमध्ये संचालक आहे त्या कंपन्यांमध्ये त्याच्यासोबत पंकज भुजबळही संचालक आहे. समीर भुजबळ चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटला ईडीच्या अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहार समजावून सांगण्यास परवानगी देण्यात आली.
ईडीचे संचालक कर्नल सिंग गुरुवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील मालमत्ता, राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या पुण्यातील ठिकाणांवर छापे घालण्यात आल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते कर्नल सिंग यांनी फेटाळली. असे काहीही झाले नाही, असे ते म्हणाले. छगन भुजबळ परदेशातून ७ फेब्रुवारी रोजी परतत आहेत, असे त्यांच्या वकिलाने सांगितले.
समीर आणि पंकज भुजबळ हे दोघेही सगळ्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. असे असताना समीरसोबत पंकजलाही का बोलावण्यात आले नाही, असे विचारता छापे घालणाऱ्या तुकडीतील अधिकारी म्हणाला की, तिन्ही भुजबळांना एकत्र आणण्याची आमची मूळ योजना होती, परंतु आम्हाला एकटा समीर घरी आढळला. छगन भुजबळ यांचा अमेरिका दौरा आधीच ठरला होता. तिकीटही त्यांनी २० जानेवारी रोजी काढले होते.
ाुढील आठवड्यात आम्ही पंकज भुजबळला चौकशीसाठी बोलावणार आहोत, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. समीर भुजबळला वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये गुरुवारी नेण्यात आले व त्यानंतर ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. सी.ए. करणार खुलासा
दरम्यान, भुजबळांचे वकील संजय यादव म्हणाले की, समीरच्या सीएला ईडीने बोलावले होते व तो त्यांच्याकडे सगळ्या व्यवहारांचा खुलासा करीत आहे. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना जी अनेक कागदपत्रे हवी होती तीदेखील पाठविली. पंकजसाठी अटकपूर्व जामीन अर्ज करणार का? असे विचारता यादव म्हणाले की, त्यासंदर्भात आम्ही काहीही ठरविलेले नाही. छगन भुजबळ हे ७ फेब्रुवारी रोजी भारतात येत असून, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते एक दिवस आधीच येत आहेत, असेही यादव म्हणाले.
इतरांनी दिली कबुली
च्भुजबळांचा चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक, मार्केट आॅपरेटर सूरज जजोदिया, वेगवेगळ्या कंपन्यांचा नियंत्रक प्रवीण जैन, कोलकाता येथील आर्थिक सल्लागार संजीव जैन आणि आणखी एक सी.ए. चंद्रशेखर सारडा यांनी भुजबळांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संशयास्पद कंपन्या स्थापन करण्यात आपली काय भूमिका होती हे आधीच कबूल केले आहे.
च्भुजबळांच्या कंपन्यांचे समभाग (शेअर्स) अवास्तव बाजारभावात विकून रोख पैसे स्वीकारण्यासाठी व त्याचे रूपांतर धनादेशात करण्यासाठी बनावट गुंतवणूक कंपन्या स्थापन केल्या होत्या.
च्मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे (एमईटी) संजय जोशी, तनवीर शेख, गीता जोशी, निमेश बेंद्रे आणि राजेश धारप यांना भुजबळांनी लाच घेण्यासाठी ज्या काही बनावट कंपन्यांची स्थापना केली होती त्यांचे संचालक बनविण्यात आले होते. या पाचही जणांनी आम्ही ते व्यवहार समीर भुजबळच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले. रास्ता रोको
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे उत्तर-मध्य जिल्हा अध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि तालुका अध्यक्ष सुनील गिरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खेरवाडी जंक्शन येथे निदर्शने केली. घटनास्थळावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. खेरवाडी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.