Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:34 PM2022-02-04T14:34:55+5:302022-02-04T14:35:01+5:30
Bandatatya Karadkar: 'माफी मागण्यात कमीपणा नाही, त्या दोघी मला मुलीसारख्या आहेत.'
सातारा: पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दारु पितात, असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. पण, आता अखेर बंडातात्यांनी माफी मागितली आहे.
मीडियासमोर येऊन बंडातात्यांनी आपले विधान मागे घेतले आणि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली. तसेच, पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी, सदाचारी आहेत, असं बंडातात्या म्हणाले. सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. काही ऐकीव माहितीच्या आधारे मी ते विधान केले. माझ्या मनात त्यांच्याविरोधात काहीच मत नाही. त्या दोघींना भेटून दिलगीरी व्यक्त करणार आहे, असं बंडातात्या म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सुप्रिया आणि पंकजा यांना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागतो. माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही ते म्हणाले.