बीडमध्ये धनंजय मुंडेविरुद्ध पंकजा अशीच लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:34 PM2019-04-05T18:34:22+5:302019-04-05T18:34:22+5:30
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.
मुंबई - लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्यांत मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखाजवळ येत असल्याने प्रचाराचा वेग सुद्धा वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मात्र चुरशीची ठरणार आहे. बीडमध्ये निवडणूक जरी राष्ट्रवादी आणि भाजप पक्षात असली तरीही खरी लढत धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणार आहे. यापूर्वी बीडमधील लढत शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात रंगायची. मुळात शरद पवार यांनी कधीही बीडमधून निवडणूक लढवली नाही. परंतु, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागायची. म्हणून बीडमधील लढतीला कायम महत्त्व निर्माण व्हायचे. आता ही लढत मुंडे कुटुंबियांतच रंगत आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे पंकजा आणि प्रितम या दोन्ही बहिणींनी एकीकडे तर धनंजय मुंडे एकीकडे असा लढा पाहयला मिळत आहे.
बीड मतदारसंघात प्रितम मुंडे युतीच्या उमदेवार आहे तर महाआघाडी कडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही लढत धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणार आहे. प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी बहीण पंकजा मतदारसंघ पिंजून काढत आहे. तर दुसरीकडे भाऊ धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासाठी सभांचा धडका लावला आहे. त्यामुळे मुंडेविरुद्ध मुंडे अशी लढत बीडकरांना अनुभवायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील राजकरणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एका बाजूला राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहे तर दुसऱ्या बाजूला विधानसभेचे विरोधीपक्षनेता. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये भावा- बहिणीच्यातलं हाडवैरं पाहायला मिळत आहे.