पंकजा-धनंजय मुंडे यांनी एकत्रित राहावे; मुंडे बहीण-भाऊ प्रथमच एका व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:47 AM2023-12-06T07:47:11+5:302023-12-06T07:47:28+5:30
जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे
परळी (जि. बीड) : परळीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्रित होते. पंकजा व धनंजय तुम्ही असेच एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी आहे. हा मंच असाच एकत्रित राहू द्या, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे या पालकमंत्री असतानाच्या कामांचा उल्लेख केला. तसेच आता धनंजय मुंडे यांना निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वासही दिला.
केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत परळी वैद्यनाथचा समावेश करण्यासाठी आपण स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू. परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग परिपूर्ण विकासाने समृद्ध होईल. सध्या मराठवाडा दुष्काळाच्या छायेमुळे संकटात आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. शासन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
बाजूच्या घरातही तुम्हाला बोलवत नाहीत...
ज्यांना कोणी बाजूच्या घरातही बोलवत नाहीत, असे लोक आमच्यावर टीका करू लागले आहेत. आम्हाला प्रचारासाठी परराज्यातही बोलवतात, यामुळे विरोधकांचे पोट दुखू लागल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आता पुढच्या वेळी अजित पवार यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप देणार
जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारा तास वीज कशी मिळेल यासाठी पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
लेक माझी भाग्याची, लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबात मुलीने जन्म घेतला ते कुटुंब लखपती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या प्रारंभी फडणवीस यांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ऊर्जेमुळेच आपण राजकारणात असल्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले.
मराठवाड्याला हक्काचे पाणी
निसर्गावर अवलंबून न राहता कायमस्वरूपी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचनाच्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला त्यांचे हक्काचे पाणी देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. इतरत्र वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देऊ. मराठवाडा दुष्काळमुक्त केला जाईल. बीडच्या पाण्याचाही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.