पंकजा मुंडेंना एसीबीची क्लीनचिट
By admin | Published: December 22, 2016 04:44 AM2016-12-22T04:44:48+5:302016-12-22T04:44:48+5:30
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना कथित चिक्की घोटाळ््याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीनचिट
मुंबई : महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना कथित चिक्की घोटाळ््याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीनचिट दिली आहे. त्यासंदर्भातील सर्व फाईल एसीबीने बंद करुन त्याचा अहवाल गृहविभागाला पाठवला आहे.
अंगणवाडीच्या वस्तूसाठी पंकजा मुंडे यांनी नियम धाब्यावर बसवले. तसेच त्यांनी एका दिवसांत २०६ कोटींच्या वस्तूसाठी २४ कंत्राटे दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या चिक्की घोटाळ््याप्रकरणी चौकशी करण्यासाठी २४ जून २०१५ रोजी एसीबीकडे विरोधी पक्षांकडून तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने तपास सुरु केला. मात्र तपासात तक्रार अर्जामध्ये घेतलेल्या आक्षेपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त केशव पाटील यांनी दिली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत अंगणवाडीसाठी एका दिवसात २४ कंत्राटे का दिली? असा आक्षेप होता. (विशेष प्रतिनिधी)
आज सत्य जनतेसमोर आलेच...
एसीबीच्या अहवालाने आमच्या विभागाला न्याय मिळाला. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झाले. चिक्की व इतर वस्तूंची खरेदी ही नियमानुसारच केलेली होती. हे मी वारंवार विधिमंडळात आणि बाहेरही सांगितले. मात्र, विरोधकांनी त्याचे राजकारण करीत आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी निराधार आरोप केले पण आज सत्य जनतेसमोर आलेच.
- पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री
कॉँग्रेस-राष्ट्रवादीची टीका
स्वत:च चोरी केलेल्या चोराच्या साक्षीवर एसीबीने या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. महिला बालकल्याण विभागाच्या खरेदी प्रक्रियेत माफिया कार्यरत असून राज्य सरकारचे या माफियांना संरक्षण आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे सरकारची दडपशाही आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांचे संरक्षण कसे करतात त्याचे हे उदाहरण
आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढू व या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.
मुंडे यांना दुसरा दिलासा
अंगणवाड्यांसाठी घरपोच आहार पुरविण्याचे कंत्राट देण्यासाठी अवलंबिलेली निविदा प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच योग्य ठरवित पंकजा मुंडे यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर बुधवारी चिक्की प्रकरणात त्यांना एसीबीने दिलासा दिला.