पंकजा मुंडेंच्या एन्ट्रीने तर्कवितर्क
By admin | Published: October 20, 2015 11:16 PM2015-10-20T23:16:22+5:302015-10-20T23:53:47+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी बालेकिल्ला : कृष्णा कारखान्याच्या गळीत हंगामास प्रमुख उपस्थिती
अशोक पाटील-- इस्लामपूर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर कृष्णा कारखान्याची सत्ता सहकार पॅनेलप्रमुख डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे आली. विधानसभा निवडणुकीपासून भोसले पिता—पुत्र भाजपमध्ये आहेत. परंतु त्यांनी कारखाना निवडणुकीत सर्व पक्षांना एकत्र केले होते. कारखाना कार्यक्षेत्रावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या पक्षांचे संचालकही कारखान्यावर कार्यरत आहेत. असे असताना भोसले यांनी ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना गळीत हंगामास पाचारण केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच मुंडे यांची एन्ट्री होत असल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
कऱ्हाड, वाळवा व कडेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सह. साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच सभासदांनी आर्थिक बाजूने सक्षम असलेल्या डॉ. सुरेश भोसले यांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली. वाळवा तालुक्यातील माजी मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादीची फौज त्यांच्या पाठीशी होती, तर काही कार्यकर्ते डॉ. इंद्रजित व अविनाश मोहिते यांच्या पाठीशी होते. कऱ्हाड व कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भोसले यांना पाठिंबा दिला होता.
जयंत पाटील यांचे समर्थक तिन्ही गटामध्ये विखुरल्याने त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. परंतु दक्षिण कऱ्हाडचे माजी आ. विलासराव पाटील—उंडाळकर यांनी खुलेपणाने भोसले यांना पाठिंबा दिला होता. याच मतदार संघातील काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण, कडेगावचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ताकद लावली होती. परंतु भोसले यांनी सर्वपक्षीय सवंगडी एकत्र केल्यानेच त्यांना विजयश्री खेचून आणता आली.
‘कृष्णा’च्या नूतन संचालक मंडळामध्ये भाजपचे ८ संचालक वगळता उर्वरित ११ राष्ट्रवादीचे, तर २ काँग्रेसचे संचालक आहेत. अशी परिस्थिती असतानाही भोसले यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
कारखान्याच्या गळीत हंगामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु ते उपलब्ध न झाल्याने महिला, बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना कारखान्याच्या गळीत हंगामास पाचारण केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
कृष्णा कारखाना सक्षमपणे चालविणे हा अध्यक्षांसह संचालकांचा मुख्य उद्देश आहे. मंत्रिमंडळातील मंत्री हे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आमंत्रित करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही.
- जितेंद्र पाटील, बोरगाव
संचालक, कृष्णा कारखाना.
भाजपची झालर...
‘कृष्णा’च्या नूतन संचालक मंडळामध्ये भाजपचे ८ संचालक वगळता उर्वरित ११ राष्ट्रवादीचे, तर २ काँग्रेसचे संचालक आहेत. अशी परिस्थिती असतानाही भोसले यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गळीत हंगामासाठी मुख्यमंत्री उपलब्ध न झाल्याने भोसले यांनी पंकजा मुंडे यांना कारखान्याच्या गळीत हंगामास पाचारण केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपची झालर लागणार आहे.