भाजपच्या विभागीय बैठकीला पंकजा मुंडेंची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:10 PM2019-12-09T15:10:26+5:302019-12-09T15:15:19+5:30
सकाळपासूनच एकच चर्चा होती, ती म्हणजे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे या बैठकीला हजर राहणार की नाही.
मुंबई : भाजप सध्या राज्यात विभागवार आढावा बैठका घेत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघातील कारणांचा राजकीय समीकरणांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका सुरू आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांची नाराजी या बैठकीतून पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागाच्या बैठकीत पंकजा मुंडे गैरहजर राहिल्यामुळं त्याच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
रविवारी जळगावात झालेल्या भाजपच्या विभागवार आढावा बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गैरहजरीमुळे भाजपमधील नेत्यांची नाराजी समोर आली होती. तर आज औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे यांची गैरहजरी पाहायला मिळाली.
सकाळपासूनच एकच चर्चा होती, ती म्हणजे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे या बैठकीला हजर राहणार की नाही. मात्र पंकजा मुंडे ह्या या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांची तब्बेत ठीक नसून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर त्या भाजप सोडणार इथपर्यंत चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा पंकजा मुंडेंनी केला होता. परंतु त्यांच्या आजच्या गैरहजरीमुळे पुन्हा त्यांच्या नाराजीची चर्चा पाहायला मिळत आहे.