“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:04 PM2024-04-29T15:04:00+5:302024-04-29T15:04:14+5:30
Pankaja Munde News: मला कोणीही रोखू शकत नाही. विरोधकांचे तीनही खासदारही होणार आहेत का, असा खोचक सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
Pankaja Munde News: तुम्हाला कांद्याची चिंता आहे. कापसाची चिंता आहे. मी तुम्हाला वचन देते, तुमच्या या चिंता सोडवण्यासाठीच संसदेत चालले आहे. विकास करते असे तुम्हाला वाटते का? कधीही जातीवाद केला नाही. कधीही धर्माचे राजकारण केले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संधी दिली आहे. बीड जिल्हा मला मान खाली घालायला लावणार नाही, असे आश्वासन भाजपाच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिले.
एका प्रचारसभेला संबोधित करताना पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. भर पावसात पंकजा मुंडे यांनी संबोधन पूर्ण केले. निवडून आले तर सामान्य माणसांना न्याय मिळेल. या सामान्य माणसांना कोणाच्या दारात जावं लागणार नाही. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आपले महायुतीचे साडेतीनशे खासदार होणार आहेत, पण विरोधकांचे तीनही खासदारही होणार आहेत का? मग आपले मत कशाला वाया घालायचे, असा खोचक सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
तुमच्यावर असाच विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही
देशामध्ये आणि राज्यामध्ये बीड जिल्हा एक विकासाचे नवीन समीकरण निर्माण करणार आहे. आता कुणीतरी सांगितले की, ही निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे. मात्र, बीड जिल्ह्याची जनता विकासाच्या बाजूने आपले मत देईल हा मला विश्वास आहे. तुम्ही उन्हात तर मी उन्हात आणि तुम्ही पावसात तर मी पावसात. असा मतांचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर असाच विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. मला कोणीही रोखू शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.