कर्मचा-याने चप्पल उचलल्याने पंकजा मुंडे पुन्हा वादात
By Admin | Published: August 13, 2015 10:20 AM2015-08-13T10:20:15+5:302015-08-13T10:24:16+5:30
दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचा-याने उचलल्याचे समोर आल्याने नवा वाद उफाळला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - चिक्की घोटाळ्यामुळे उसळलेला वाद संपतो ना संपतो तोच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा पुन्हा वादात अडकल्या आहेत. दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचा-याने उचलल्याचे समोर आल्याने नवा वाद उफाळला आहे. एका वृत्तवाहिनीने हे दृश्य प्रसिद्ध केले असून तो कर्मचारी पंकजा यांच्या चपला उचलताना दिसत आहे.
पंकजा यांनी नुकताच परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, त्यावेळी चिखलमय रस्त्यावरून जाताना पंकजा यांनी त्यांची चप्पल काढून ठेवली. त्यांनी पायातून चप्पल काढून ठेवताच, त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचा-याने ती हातात घेतली. हे दृश्य प्रसिद्ध होताच नवा वाद उफाळला असून विरोधकांनी मुंडे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
'दुष्काळग्रस्त भाग्चाय दौ-यावर असलेल्या पंकजा यांचा हा थाट, हे वर्तन आक्षेपार्ह असून यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते' असे टीकास्त्र काँग्रेसने सोडले आहे. ' शेतकरी व गरिबांचे भलं करणार अशा देखाव्यापुरत्या घोषणा करणा-या सरकारमधील मंत्रीच सामान्य गरीब व्यक्तीला आपली चप्पल उचलायला लावतात, ते इतरांच भलं कसं करणार? असा सवाल काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.
पंकजा मुंडे यांनी हा आरोप फेटाळून लावत आपली चप्पल उचलणारी व्यक्ती म्हणजे आपला खासगी कर्मचारी असल्याचे करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'मी चप्पल काढली आणि ती दुस-या माणसाने उचलली हे दाखवणा-या मीडियाने अनवाणी चालताना आपल्याला किती त्रास झाला हे मात्र दाखवल नाही' असे सांगत त्यांनी उलट मीडियावर टीका केली.