मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत पंकजा मुंडे, राम शिंदे नापास
By admin | Published: February 24, 2017 04:15 AM2017-02-24T04:15:05+5:302017-02-24T04:15:05+5:30
‘निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये भाजपाची कामगिरी चांगली होणार नाही, त्यांना घरी जावे लागेल’, असे विधान
मुंबई : ‘निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये भाजपाची कामगिरी चांगली होणार नाही, त्यांना घरी जावे लागेल’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तीनच दिवस आधी केले होते. त्यांच्या परीक्षेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे नापास झाल्याचे निकालावरून दिसते.
भाजपाच्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या कामगिरीचे श्रेय त्यांच्या एकट्याचे नक्कीच नाही. पराभवाचे आणखी काही वाटेकरीदेखील असू शकतात. पण मुख्यमंत्र्यांनी खराब कामगिरीची कसोटी उद्या लावलीच तर कोणत्या मंत्र्यांची अडचण होऊ शकते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पंकजा यांच्या बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. दोन मुंडेंच्या वर्चस्वाच्या लढाईत धनंजय यांनी बहिणीवर मात केली.
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे पालकमंत्री असलेल्या लातूरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली. तसेच पंचायत समित्यांमध्येही भाजपाला दमदार यश मिळाले आहे. गिरीश बापट पालकमंत्री असलेल्या पुण्यामध्ये भाजपाला सत्ता मिळाली.कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात भाजपाने आजवरच्या सर्वाधिक जागा जिंकल्या. बाजूच्या अकोलामध्ये भाजपाने महापालिकेत एकहाती सत्ता संपादन केली. यवतमाळ जिल्हा परिषदेत भाजपापेक्षा चार जागा अधिक मिळवून शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार यांना मात दिली.
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर, सांगली व साताऱ्याची जबाबदारी होती. त्यातील सांगलीमध्ये भाजपाची सत्ता येत आहे. कोल्हापुरात गेल्यावेळी केवळ एकच जागा असलेल्या भाजपाने आघाड्यांच्या मदतीने २६ चा आकडा गाठला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जालना जिल्ह्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेसाठी इतरांच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री विजय देशमुख एकमेकांशी न पटणाऱ्या जोडगोळीच्या सोलापुरात भाजपाला महापालिका आणि जिल्हा परिषदेत चांगले मिळाले.
त्यातही महापालिकेतील यश हे लक्षणीय आहे. अमरावतीमध्ये राज्यमंत्री प्रवीण पोटे हे महापालिका व जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकांसाठी पक्षाचे प्रभारी होते. जिल्हा परिषदेत पक्षाला चांगले यश मिळाले नाही पण महापालिकेत सत्ता मिळत आहे. महापालिकेत माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉ.सुनील देशमुख यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.
मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जबाबदाऱ्या
मुंबईत भाजपाला जे मोठे यश मिळाले त्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावमध्ये जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपाला एकच जागा कमी पडली. अर्थात त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे. महाजन पालकमंत्री असलेल्या नाशिकमध्ये महापालिकेत भाजपाला सत्ता मिळाली.