Pankaja Munde : ‘अंगार-भंगार काय आहे, स्वत:ची लायकी ठेवा’, समर्थकांच्या घोषणाबाजीवर पंकजा मुंडे संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:20 AM2021-08-17T08:20:58+5:302021-08-17T08:21:29+5:30
Pankaja Munde : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रा परळीतील गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन सोमवारी सुरू झाली.
परळी (जि. बीड) : तुमच्या बालिशपणाचा मला त्रास होतो. मूर्ख आहात का? हा काही दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का, ही पद्धत आहे का वागायची, ‘मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणा मी रोखू शकत नाही; पण अंगार-भंगार काय आहे, हे मला आवडत नाही. जेवढ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, नाही तर मला भेटायला यायचं नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रा परळीतील गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन सोमवारी सुरू झाली. या यात्रेस पंकजा यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मुंडे समर्थकांनी ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी केली. यावर पंकजा संतापल्या होत्या. सकाळी पंकजा यांनी निवासस्थानी डॉ. कराड यांचे स्वागत केले. येथेही कार्यकर्त्यांनी घोषणबाजी केली. येथून श्री वैद्यनाथ मंदिर पायरीचे कराड यांनी दर्शन घेतले.
गोपीनाथ गड प्रेरणा देणारा : भागवत कराड
गोपीनाथगड येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमचे नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या स्मरणार्थ हा गोपीनाथ गड बांधलेला आहे. ‘हा गड प्रेरणेचा, हा गड ऊर्जेचा’ असे याचे ब्रीद आहे. येथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रेरणा घेऊनच जातो. आमच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत. त्यांच्या हस्ते यात्रेस सुरुवात करीत आहोत. सोबत खा. प्रीतम मुंडे याही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.