बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 08:13 AM2024-02-29T08:13:06+5:302024-02-29T08:13:52+5:30
Loksabha Candidate BJP Maharashtra: नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते.
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीडमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी कोण? या मुद्यावर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. दुसरीकडे अमरावतीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाईल आणि तेथे सध्याच्या खासदार नवनीतकौर राणा उमेदवार असतील, असेही समजते.
विद्यमान खासदार प्रीतम यांचे दुसऱ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. २०१४ ची पोटनिवडणूक आणि २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक या दोन्हींमध्ये प्रीतम जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय हे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले पण यावेळी चित्र वेगळे आहे. पंकजा यांना उमेदवारी पक्की मानली जात असताना धनंजय हे त्यांच्या प्रचारात दिसतील.
राणांच्या भूमिकेकडे लक्ष
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अमरावतीच्या मतदारांना हे चिन्ह अंगवळणी पडले आहे. त्यामुळे नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते.
दुरावा कमी झाल्याचा फायदा
मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा या दोघांमधील दुरावा कमी झाला आहे. मुंडे भगिनींपैकी कोणीही उमेदवार असले तरी आपण पाठीशी भक्कमपणे उभे राहू असा शब्द धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. पंकजाताईंच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा झाली होती पण तसे झाले नाही. तेव्हा, ‘पंकजाताईंबाबत चांगलेच होईल’ असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले होते.
६ जणांची समिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची एक समिती भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी नेमली आहे.
संभाव्य उमेदवार निश्चित करण्यास या समितीला सांगण्यात आले आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आणि त्यात संभाव्य नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा संधी द्यायची की पीयूष गोयल, आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांपैकी एकाला द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे म्हटले जाते.