दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात; 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 03:37 PM2023-08-29T15:37:29+5:302023-08-29T15:37:58+5:30
दोन महिन्यांच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.
परळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काही दिवसांसाठी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा ही त्यांनी केली होती. गेल्या दोन महिन्यात त्यांनी कुठलेही राजकीय वक्तव्य किंवा सभा, बैठका घेतल्या नाही. आता दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.
श्रावण सोमवार आणि बरेच काही...
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 28, 2023
Official Youtube Channel Link,https://t.co/JQbVYhky2X
दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'शिवशक्ती' यात्रा काढणार आहेत. या काळात 11 दिवसांत राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा सुरू करतील. मात्र, हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादीत असेल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. या दौऱ्यामध्ये त्या पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे.
त्यानंतर नाशिक, नगर , पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मंदिरांत देवदर्शन करणार आहेत. दौऱ्यात फक्त मंदिरात देवदर्शन करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र, पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला राजकीय महत्वदेखील आहे. पंकजा मुंडे मोठ्या नेत्या असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची/समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या देवदर्शनाच्या दौऱ्यानंतर त्या राजकारणात सक्रिय होतील, अशी अपेक्षा आहे.