‘पंकजा मुंडेंची हकालपट्टी करा’
By admin | Published: July 15, 2016 03:28 AM2016-07-15T03:28:06+5:302016-07-15T03:28:06+5:30
महिला व बाल विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या घरपोच आहार योजनेत टेंडर प्रक्रियेतून तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत, या प्रकरणाची एसीबीमार्फत
मुंबई : महिला व बाल विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या घरपोच आहार योजनेत टेंडर प्रक्रियेतून तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत, या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी केली जावी आणि खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘लहान मुले, स्तनदा व गरोदर माता यांच्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत घरपोच आहार पुरवठा योजना राबवली जाते. भाजपा सरकार आल्यानंतर ही योजना राबवताना काही मोजक्या बड्या ठेकेदारांना त्याचा फायदा कसा मिळेल आणि बचत गट यातून बाहेर कसे पडतील, याचा डाव आखण्यात आला. त्यासाठी केंद्रीकरण पद्धतीने टेंडर देण्याचा प्रस्ताव मंत्री मुंडे यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला होता. मात्र, त्याला अर्थ आणि उद्योग विभागाने विरोध केला. त्यानंतर, या कामाचे टेंडर देताना विकेंद्रीकरण पद्धतीने दिले जातील, असा शासन निर्णय २५ फेब्रुवारी २०१६ ला काढला. असे असतानाही चार दिवसांनी पुन्हा एक शासन निर्णय मंत्रिमंडळाची परवानगी न घेता काढण्यात आला. त्यानुसार, टेंडर देताना काही जाचक अटी आणि शर्ती टाकून मंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे केंद्रीकरण पद्धतीप्रमाणेच टेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)