"सगळे आमच्या अंगावर घालताय, मग...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:46 PM2024-09-04T17:46:29+5:302024-09-04T17:48:41+5:30
Pankaja Munde Maharashtra Assembly Election 2024 : मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेल्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. पंकजा मुंडेंनी प्रश्न उपस्थित करत पवारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
Maharashtra Assembly election 2024 Pankaja Munde : "आता आरक्षणाच्या बाबतीतील फेक नरेटिव्ह चालणार नाही. आता बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर", असे म्हणत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. विशेषतः पंकजा मुंडेंनीशरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला आणि उलट सवाल केला.
विधानसभा निवडणुकीची भाजपकडून रणनीतीनुसार तयारी सुरू आहे. लोकसभेप्रमाणे भाजपने विधानसभा मतदारसंघ प्रवास योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
खासदार पंकजा मुंडे यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा, वडगाव शेरी विधानसभा, कोथरूड विधानसभा या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मतदारसंघात पंकजा मुंडे फिरून आढावा घेत आहेत. वडगाव शेरी येथील भाजप पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडेंनी बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला होता. यावरून पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या, "विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे फेक नरेटिव्ह खोडून काढण्याचे मोठे आव्हान आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला (शरद पवार गट) तुम्ही सवाल विचारा, तुमची भूमिका काय?"
"तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय , मग तुमची भूमिका काय? तुम्ही आपल्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला विचार तुमचे म्हणणे आहे का, की ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे? सगळच तुम्ही आमच्या अंगावर घालताय? आमच्यावर ओबीसी समाज घालताय. मराठा समाज आमच्या अंगावर घालताय, दलित बांधवांना आमच्या अंगावर घालताय, जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि इथले राजकारण उद्ध्वस्त करतोय", अशा शब्दात पंकजा मुंडेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला.