पंकजा मुंडे लोकसभा तर यशश्री मुंडे विधानसभा लढवणार ?
By Admin | Published: June 10, 2014 11:58 AM2014-06-10T11:58:38+5:302014-06-10T15:11:56+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे - पालवे यांना तर यशश्री मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे - पालवे या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पंकजा यांना केंद्रात राज्यमंत्री पद देण्यात येईल अशी चिन्हे असून गोपीनाथ मुंडे यांची कनिष्ठ कन्या यशश्री मुंडे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारीही भाजप नेत्यांनी सुरु केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे गेल्या आठवड्यात दिल्लीत कार अपघातात निधन झाले. मुंडे यांच्या अकाली निधनाने राज्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे. मुंडेच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवार पुढील सहा महिन्यात निवडणूक लढवणे आवश्यक आहे. मुंडे यांच्यानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे - पालवे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे या सध्या परळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. पंकजा लोकसभेत गेल्यास परळीतून मुंडेंची कनिष्ठ कन्या यशश्री मुंडे यांना विधानसभेचे तिकीट दिले जाईल असे समजते. राज्यातील भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर सहमती दर्शवल्याचे समजते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. २२ जूननंतर या सर्व निर्णयांवर वरिष्ठ पातळीवरुन शिक्कामोर्तब केले जाईल असे सूत्रांनी सांगितले.
मुंडेंच्या निधनाची सीबीआय चौकशी करा
गोपीनाथ मुंडे यांच्या कार अपघातावर संशय व्यक्त केला गेला होता. मुंडेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परळीतील मुंडे समर्थकांनीही या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मंगळवारी राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. यापूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनीही मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता गृहमंत्री राजनाथ सिंह याविषयी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.