पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यासाठी केल्या 'या' मागण्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:40 IST2024-12-08T17:39:59+5:302024-12-08T17:40:55+5:30
Pankaja Munde Meets Devendra Fadnavis: महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंकजा मुंडेंनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यासाठी केल्या 'या' मागण्या...
Pankaja Munde Devendra Fadnavis: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयानंतर 5 डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, सरकारच्या शपथ स्थापनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मराठवाड्यासाठी मोठी मागणी केली.
पंकजा मुंडेंनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन केले. पंकजा मुंडे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मराठवाड्यातील दुष्काळ निवारण आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.''
Personally congratulated @Dev_Fadnavis ji..spoke on issues of #marathwada, especially eradicating drought and resolving unemployment in some areas,he assured a special attention to economically backward areas in #Maharashtra and problems of migrating labour issues in #beedpic.twitter.com/YQjYtdeVHs
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 8, 2024
पंकजा मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार?
भाजपच्या महाराष्ट्रातील फायरब्रँड नेत्यांमध्ये पंकजा मुंडेंचे नाव घेतले जाते. 2014-2019 मध्ये त्यांच्याकडे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. पण, मागील पाच वर्षे त्यांच्यासाठी अतिशय वाईट ठरले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजांचा बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) बजरंग सोनावणे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर भाजपने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावत राजकीय पुनरवसन केले.
आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. लवकरच नवीन सरकारचे खातेवाटप जाहीर होणार आहे. यंदा पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ओबीसी मतांचा आणि मराठवाड्याचा विचार करता पंकजा मुंडेंना मंत्रीपद देणे, भाजपसाठीही महत्वाचे आहे. या महिन्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यापूर्वी खाटेवाटप होणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घेतले जाते का आणि कोणते खाते दिले जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.