...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:07 PM2023-06-01T12:07:32+5:302023-06-01T12:09:20+5:30
गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले असं राऊत म्हणाले.
मुंबई - गोपीनाथ मुंडे असते तर नक्कीच शिवसेना-भाजपाला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र दिसतेय ते नसते. मुंडे नसल्याने आज त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जातेय हे स्पष्ट दिसते अशा परिस्थितीत परिवारातील प्रमुख व्यक्ती जी राजकारणात आहे त्यांनी साहसाने, हिंमतीने परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे गरजेचे असते. जर निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले. अनेक बहुजन समाजातील नेते ज्यांनी भाजपा महाराष्ट्रातून शून्यातून उभी केली. त्या मुंडे कुटुंबाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहू नये यासाठी दिल्लीत आणि इथं प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. मुंडे कुटुंबाबद्दल आमच्या मनात आस्था आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज जे चित्र असते ते दिसले नसते. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहात केली जातेय. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा, आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कुणी विचारत नाही असं विधान त्यांनी केले.
राहुल गांधी सध्या फॉर्मात
राहुल गांधी अमेरिकेत असून त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय, जे येतायेत ते भाड्याने येत नाही. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारखे राहुल गांधी सध्या फॉर्मात आहे. जोरदार बॅटिंग करतायेत. संसद सदस्यत्व रद्द झालंय, घर सोडावे लागले. पासपोर्ट काढून घेतला तरी राहुल गांधी देशासाठी लढाई लढतायेत. मोदी आणि त्यांचे नेते याआधी काय करायचे. देशाबाहेर आपल्या समुदायासमोर देशातील स्थिती सांगितली तर त्याला अपमान कसं म्हणता येईल? असं सांगत संजय राऊतांनी भाजपा नेत्यांवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे पटणाला जाण्याच्या विचारात
१२ जून रोजी सर्व प्रमुख नेत्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निमंत्रण दिले आहे. भाजपासोबत नसलेल्यांना हे निमंत्रण आहे. २०२४ मध्ये ज्यांना परिवर्तन घडवायचे आहे त्या देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना त्यांनी महाराष्ट्रात येऊन निमंत्रण दिले आहे. आम्हीदेखील पटणाला जाण्याचा विचार करतोय अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार उत्तम सांभाळला, मराठेशाही पुढे नेली. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवींचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सरकारला उपरती आली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी अहमदनगरच्या नामांतरणावर दिली.
त्याचसोबत महिला कुस्तीपटूला न्याय मिळावा ही सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यांना न्याय पंतप्रधान आणि भाजपा सरकार नाकारत आहे. गजानन किर्तीकरांनी जे विधान केले ते सगळ्यांनी ऐकले आहे. आता त्यांनी घुमजाव केले त्यांच्यावर दबाव असू शकतो. गजानन किर्तीकरांचे स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावे असं सांगत राऊतांनी भाजपावर आरोप केले.