पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय; जनसंपर्क कार्यालयातून नव्या टप्याला सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:52 AM2020-02-12T11:52:55+5:302020-02-12T11:53:07+5:30
राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत सवांद साधण्यासाठी त्या वरळीत शुभदा इमारतीतील आपल्या कार्यालयातून कामकाज पाहणार आहे.
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत. मुंबईतील वरळी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या एका नव्या टप्प्याला सुरवात करणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्या कार्यालयातून राज्यभरात जनसंपर्क ठेवला होता, त्याच कार्यालयातून पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्याने सुरवात करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर पंकजा मुंडे ह्या राजकरणापासून काही काळ अलिप्त राहिल्याच्या पाहायला मिळाल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील घेतलेला कार्यक्रम आणि त्यांतर औरंगाबाद येथे झालेलं उपोषण सोडले तर पंकजा मुंडे पक्षांच्या जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळाल्या नाहीत. तर औरंगाबादमध्ये झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीला सुद्धा त्या गैरहजर होत्या. त्यामुळे पंकजा ह्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा त्यावेळी पाहायला मिळाली.
मात्र पंकजा मुंडे ह्या आता पुन्हा नव्याने सक्रीय होणार आहेत. राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत सवांद साधण्यासाठी त्या वरळीत शुभदा इमारतीतील आपल्या कार्यालयातून कामकाज पाहणार आहे. तर या कार्यालयाच नूतनीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरु आहे. तर येथूनच पंकजा मुंडे आपला जनसंपर्क ठेवणार आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे हे सुद्धा याच कार्यालयातून कित्येक वर्षे सक्रीय होते. तर याच कार्यालयाच्या माध्यामतून त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क कायम ठेवला होता.
गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून पंकजा मुंडे ह्या सुद्धा याच कार्यालयाच्या माध्यामतून लोकांशी संपर्क ठेवणार आहे. आठवड्यातील तीन दिवस त्या या कार्यालयात असतील आणि लोकांना, कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना यात किती यश मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.