पक्षावर नाराज आहात का? पंकजा मुंडे म्हणतात, 'आणखी एक दिवस थांबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:57 PM2019-12-11T15:57:29+5:302019-12-11T15:57:45+5:30
पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मुंबई : राज्यातील भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर उद्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्या काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर ‘इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा’ असे वक्तव पंकजा मुंडेंनी माध्यमांना बोलताना केलं.
मुंबईत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यामुळे गोपीनाथ गडावर गुरुवारी (दि. १२) होणाऱ्या मेळाव्यात त्या कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मात्र पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना माध्यमांनी विचारला असता, इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा असं उत्तर पंकजा यांनी दिलं. तसेच एकनाथ खडसे माझ्याकडे आले होते. जेवणाची वेळ होती. आम्ही एकत्र जेवण केलं. ही कौटुंबिक स्वरुपाची भेट होती. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जे मुंडे साहेबांच्या गडावर इतके दिवस येत होते, ते सर्व जण उद्या येणार आहेत. हा कार्यक्रम वेगळा आहे. त्याला कोणताही राजकीय रंग नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपमधील वरिष्ठ नेते येणार का? असा प्रश्न विचारला असता ‘ज्यांनी जाहीर केलं आहे ते पक्षातील सर्व जण येतील’ असं उत्तर पंकजांनी यावेळी दिलं.