पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:33 AM2023-09-05T11:33:58+5:302023-09-05T11:34:15+5:30
सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले आहे.
सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले होते. यावर शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंकजा यांना तुमच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
आम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत. त्यांच्यात क्षमता आहे, यात मला काही शंका नाही. पंकजा मुंडे यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पहावे. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजांसोबत युती करू, असे बच्चू कडू म्हणाले.
तुम्ही लोकं जमा केली, पण लोकांची कामे देखील करावी लागतात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे. मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्याइतके सत्य आहे. या अगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजय वडेट्टीवार यांची काय गॅरंटी आहे? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. याचबरोबर मागच्या पन्नास वर्षात झालं नाही तेवढे पक्षांतर गेल्या पाच वर्षांत झाल्याचे कडू म्हणाले.
पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वरला...
शिवशक्ती परिक्रमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी मोठे स्वागत झाले. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याने पहिल्याच दिवशी माझा आवाज बसला होता. आज त्रंबकेश्वर आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. काल 5 ठिकाणी स्वागत होते पण प्रत्यक्षात 46 ठिकाणी स्वागत झाले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.