एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:45 IST2025-02-11T05:44:44+5:302025-02-11T05:45:47+5:30
मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा
मुंबई - ‘आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील, असे विधान राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. त्यानंतर तर्कवितर्क सुरू असतानाच स्वत: पंकजा यांनी त्याबाबतचा खुलासा केला आहे.
यावर माजी मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचा पक्ष त्या स्थापन करत असतील तर विचार करायला हरकत नाही. उद्धवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेचा पक्ष स्थापन करावा असे पंकजा यांना वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
‘मी गुंडाला गुंड, बंडाला बंड आहे; कोणाला घाबरत नाही...’
मी गुंडाला गुंड आहे आणि बंडाला बंड आहे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे केली. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे.
कोणत्या संदर्भाने केले होते विधान?
पंकजा मुंडे यांनी रविवारच्या विधानाचा सोमवारी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, ‘नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केले. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो. तेव्हा ते म्हणाले, ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेले तर एक पक्ष निर्माण होईल. त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हणाले की, हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजप) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. त्याचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही.