भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा नाकारली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 03:41 PM2017-09-12T15:41:27+5:302017-09-12T15:41:27+5:30
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे.
बीड, दि. 12 - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे.
गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली होती. दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींना काय करायचं आपण भविष्यात पाहून घेऊ, असं व्हायरल होणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणत असल्याचे ऐकू येत होतं.
भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेव शास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच, असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतला होता. भगवानगडाचे हे महंत आता गडाचा राजकीय गैरवापर होऊ द्यायला कितीही विरोध करत असले तरी त्यांची नियुक्ती गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आशीर्वादाने झालीय. पण गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातले संबंध दुरावले आणि त्यातूनच हा वाद चिघळला.