पंकजा मुंडेंना अधिवेशनात काम करू देणार नाही
By admin | Published: July 2, 2015 12:42 AM2015-07-02T00:42:07+5:302015-07-02T00:42:07+5:30
महिला व बालविकास मंत्रालयातील २०६ कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पंकजा मुंडे यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक व जनतेच्या मनातील शंका-कुशंकांचे निराकरण
मुंबई : महिला व बालविकास मंत्रालयातील २०६ कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पंकजा मुंडे यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक व जनतेच्या मनातील शंका-कुशंकांचे निराकरण करणारे नसल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनात पंकजा मुंडेंना कामकाज करू दिले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
गांधी भवन या काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत बोलत होते. यावेळी विखे-पाटील म्हणाले की, ठोस पुराव्यांसह तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली.
पंकजा मुंडेंनी केलेले खुलासे धादांत खोटे आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत. त्यांची आजची पत्रकार परिषद वस्तुस्थिती समोर आणणारी नव्हे तर त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणारी होती. अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी टाळले, अशी टीका सावंत यांनी केली.
इ-टेंडरींग करण्यासाठी सरकारकडे पुरेसा कालावधी उपलब्ध होता. तरीही विशिष्ट ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला. तसेच आपल्या चुकीचे समर्थन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ई-निविदेबाबत कधीही वक्तव्य केलेले नाही, ही पंकजा मुंडे यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचेही सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)