पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी
By admin | Published: April 20, 2016 01:01 AM2016-04-20T01:01:22+5:302016-04-20T01:01:22+5:30
दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत
पुणे : दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले़
मराठवाड्यात दुष्काळ असताना औरंगाबाद येथील दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली जात आहे़ त्यावर असा पाणीपुरवठा बंद करणे चुकीचे असल्याचे जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते़ सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप होत असल्याचे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘सरकार ही सामूहिक काम असून, मुख्यमंत्री त्याचे नेतृत्व करतात़ आम्हाला जबाबदारीचे भान आहे़ पाणी नियोजन, रोजगार हमी योजना, मजुरांना काम याच्या अंमलबजावणीत कमी पडतो़ काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण सरकारला निशाणा करीत आहेत़ त्यावर सर्व पक्षीय समित्या नेमून अंमलबजावणी अधिक गतीने करता येईल़ या विषयावर पंकजा मुंडे यांच्याशी आमचे मतभेद आहेत़
स्वतंत्र विदर्भाबाबत त्या म्हणाल्या, विदर्भात १०६ आमदार तसेच मुख्यमंत्र्यासह अनेक पदे मिळूनही विकास झाला नाही़ आम्हाला १० वर्षे संधी दिली असती तर विकास करून दाखविला असता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली होती़ १५ वर्षांत अनेक सिंचन प्रकल्प रखडले़, २०१२ ला पूर्ण होणारे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे अनुशेष वाढला़ महाराष्ट्र अखंड राहावा, अशी आमची भूमिका आहे़ छोट्या राज्याची भूमिका मांडणाऱ्यांनी गुजरात छोटा करून दाखवावा़ काही जणांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत़ त्यांना विकासातला मोठा भागीदार पुसून टाकायचा आहे, असे त्यांनी सांगितले़
विधिमंडळ अधिवेशनात आपण महाराष्ट्र अखंड व संयुक्त असावा, यासाठी विधान परिषद नियमानुसारचा २३ब ऐतिहासिक प्रस्ताव सादर करून शिवसेनेने मराठी जनतेशी आपली इमानदारी स्पष्ट केली़ हा प्रस्ताव आता पुढील अधिवेशनात येणार आहे़ या अधिवेशनात पुणे शहराच्या वाहतूक, कचरा, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, वीज ग्राहकांची फसवणूक, मुद्दाम उशिरा बिले देऊन केली जाते, त्याबद्दल कंत्राटदारांवर कारवाई, मुलांच्या शालेय सहलींबाबत घेण्याच्या दक्षताबाबत विधायक सूचना शासनाने स्वीकारावी, या मुद्द्यांवर प्रश्न, लक्षवेधीद्वारे आवाज उठवला़ पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे काम वीज, फर्निचरअभावी रखडले होते़ त्यासाठी आर्थिक तरतूद करून यासाठी पाऊले उचलणार असल्याचे ठोस आश्वासन विधी व न्याय विभागाने सभागृहात दिल्याचे डॉ़ गोऱ्हे यांनी सांगितले़