पंकजा मुंडेंना धक्का; आणखी एक भाऊ लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 08:32 AM2018-05-02T08:32:41+5:302018-05-02T08:32:41+5:30
१२ वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता.
मुंबई: राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावले आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल 11 वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते.
LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योग
रमेश कराड उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे. डॉ. वि. दा कराड यांचे पुतणे रमेश कराड यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच सुरु झाली होती. मात्र, १२ वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता. उस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र, आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक कराड नाणेफेकीत हरले. विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी दिली जावी या मताशी पंकजा मुंडे सहमत नव्हत्या अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नात्यातही वितुष्ट आले होते. त्यांच्य़ा नात्यातील हा तणाव अजूनही कायम आहे. मुंडे घराण्यात फूट पाडल्याच्या मुद्द्यावरून पंकजा यांचे कार्यकर्ते अनेकदा शरद पवारांवर तोंडसुखही घेताना दिसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर रमेश कराड यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पंकजा यांच्यासमोरची बिकट आव्हाने निर्माण करणारा असल्याची चर्चा रंगली आहे.