पंकजाताई, रोहिणीताईंच्या पराभवाला पक्षांतर्गत हितशत्रूच जबाबदारः खडसेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 07:04 PM2019-12-04T19:04:09+5:302019-12-04T19:05:47+5:30
पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झालेला दिसतोय.
मुंबईः पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत, असं म्हणत एकनाथ खडसेंनी खळबळ उडवून दिली आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सात तारखेला जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी येत आहेत. ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल ही अपेक्षा करू या, वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या गोष्टी मी घातलेल्या आहेत.
मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही. मीडियाच्या माध्यमातून जावं याचीही मला आवश्यकता नाही. मी वरिष्ठांनी समक्ष बोलू शकतो. जे काही घडलेलं आहे, पक्षामध्ये जी अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. ते सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे. पंकजाताई आणि माझं एकमत आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या या दोन्ही जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचा आरोपही खडसेंनी केला आहे.
दरम्यान, कालच भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपाने केला होता. पण, आम्ही त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला असं त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेंच्या मनात खदखद होती, ती खदखद त्यांनी उघडपणे बोलून दाखवली नाही. पण वर्तमानपत्रातील नाराजीच्या बातम्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या काळात शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी माझी दोनवेळा भेट घेतली. पण त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही. गेल्या 22 वर्षांची आमची युती आहे, मी 2009 साली नाराज झालो होतो, तेव्हाही माझी नाराजी दूर करून तुम्ही भाजपातच राहिलं पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचं गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलं होतं.