"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे"
By ravalnath.patil | Published: December 1, 2020 11:09 PM2020-12-01T23:09:11+5:302020-12-01T23:09:53+5:30
dhananjay munde : धनंजय मुंडे यांनी कोरोनासंबंधी सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला पंकजा मुंडेंना देत स्वतःची व घरच्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
मुंबई : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ताप आल्यामुळे त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. याबाबतची माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, या ट्विटला रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनासंबंधी सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला पंकजा मुंडेंना देत स्वतःची व घरच्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
धनंजय मुंडे ट्विटरद्वारे म्हणाले, "पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे."
पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. https://t.co/pea5Q99xT4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2020
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील मतदानाला काही तास शिल्लक असतानाच पंकजा मुंडे यांनी ट्विट केले होते. भाजपा व महायुतीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठी त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आवाहन केले आणि आपल्याला ताप आला असून आयसोलेट होत असल्याचे म्हटले होते.
"मला सर्दी, खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे... अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि शिरीष बोराळकरांच्या पारड्यात पहिल्या पसंतीची मते टाकून त्यांना विजयी करावे", असे पंकजा मुंडे यांनी ट्विट केले होते.
दरम्यान, पदवीधर मतदारसंघात भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे रमेश पोकळे हे बंडाचे निशाणा फडकावत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आधीच या मतदारसंघात काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या तोंडावरच अत्यंत महत्त्वाचे असे आवाहन केले. त्यांच्या ट्विटमधील मजकुरावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.