पुणेकरांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 02:38 AM2016-11-09T02:38:55+5:302016-11-09T02:38:55+5:30
कोची-मुझिरीज बायनाले हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलेचे दर्जेदार व्यासपीठ मानले जाते.
पुणे : कोची-मुझिरीज बायनाले हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलेचे दर्जेदार व्यासपीठ मानले जाते. पुण्यातील आठ कलाकारांच्या कलाकृतींची या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
दि. १२ डिसेंबर ते ३० मार्च या कालावधीत कोची, मुझिरी आणि आसपासच्या बेटांवर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार आहे. पुण्यातील कलाकार ‘रुट/रूट’ या संकल्पनेवर आधारित कलाकृतींसह प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील राजू सुतार हे क्युरेटर म्हणून सहभागी होत असूून ‘कलाकाराचा स्वत:चा शोध’ ही कलाकृतींमागील संकल्पना असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या प्रदर्शनामध्ये राजू सुतार यांच्यासह संदेश भंडारे, आरती किर्लोस्कर, भारती पित्रे, माधवी कोलते, राजेश कुलकर्णी, वैशाली ओक, संदीप सोनावणे हे कलाकार सहभागी होत आहेत. इन्स्टॉलेशन आर्ट, व्हिडिओ, फॅब्रिक असेंब्लेज, फोटोग्राफी, पेंटिंग, सिरॅमिक, पेपर मशीन अशा विविध कलाकृतींचा आविष्कार पहायला मिळेल. (प्रतिनिधी)