पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध

By admin | Published: June 12, 2016 06:36 AM2016-06-12T06:36:42+5:302016-06-12T06:36:42+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याचा ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी

Pansare is also a liar | पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध

पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध

Next

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याचा ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. सीबीआयचा तपास पूर्ण झाल्यानंतर पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याला ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी शनिवारी सांगितले.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एसआयटी पथकाने सांगली येथील सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याला अटक केली आहे.
उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी रात्री डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केली. तावडे याचे आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन सीबीआयच्या तपासामध्ये पुढे आल्याने त्याचा पानसरे हत्येशी काही संबंध आहे का, यासंबंधी एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, डॉ. तावडे याचा पानसरे हत्येशी संबंध असल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत. डॉ. दाभोलकर, पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासावर आम्ही तिन्ही तपासयंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहोत. पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करणार आहोत.

तावडेचा समीर, रुद्रशी संवाद
डॉ. तावडे याचा मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सनातनचा साधक समीर गायकवाड, प्रवीण लिमकर यांच्याशी फोनवरून अनेक वेळा संवाद झाला आहे. तावडेच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून ही माहिती पुढे आल्याचे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेल येथील आश्रमातही त्यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्याचे समजते. हे सहाजणांचे रॅकेट असून त्यांनी या तिन्ही हत्या घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

तावडे जिल्हा संघटक
डॉ. तावडे २००२ ते २००८ या कालावधीत कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील साईक्स एक्स्टेन्शन येथे आई-वडील व पत्नीसोबत राहत होता. त्याने कान, नाक, घसा विकारतज्ज्ञ म्हणून गंगावेश येथील एका इमारतीत प्रॅक्टिसही केली आहे. त्याकाळात स्थानिक डॉक्टरांशी त्याने चांगले संबंध ठेवले होते. त्याचे संपूर्ण कुटुंब साधक म्हणून काम करीत होते. २००८ नंतर त्याने साईक्स एक्स्टेन्शन येथील बंगला विकून सातारा गाठला. या ठिकाणी दीड वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला. त्यानंतर तो सनातनच्या पनवेलमधील आश्रमात वैद्यकीय सेवा देण्यासाठी गेला. हिंदू जनजागृती व सनातन संस्थेचा कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून तो काम पाहत होता. (प्रतिनिधी)

ज्यांनी समाजासाठी स्वत:चे जीवन वाहिले, अशा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला पावणेतीन वर्षांनी एक माणूस सापडला. त्याच्याजवळ काय पुरावे मिळाले ते पुढे आणावेत. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांच्या तपासावर आम्ही नाउमेद झालो आहोत.
- प्रा. एन. डी. पाटील,
राज्याध्यक्ष, अंनिस

Web Title: Pansare is also a liar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.