पानसरे हल्ल्याचा तपास अंधातरी
By Admin | Published: March 5, 2015 01:23 AM2015-03-05T01:23:10+5:302015-03-05T01:23:10+5:30
ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूने शोध सुरू असला तरी पोलिसांना अजून कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत,
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूने शोध सुरू असला तरी पोलिसांना अजून कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत, अशी कबुली पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच उमा पानसरेंना मानसिक धक्का बसल्याने त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती विसंगत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही नक्कीच हल्लेखोरांपर्यंत पोहोचू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. पानसरे दाम्पत्यावरील प्राणघातक हल्ल्यास १७ दिवस झाले, परंतु पोलिसांना कोणतीच ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तपासाचा आढावा घेण्यासाठी दयाल मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुधवारी तपास पथकांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दयाल म्हणाले, की हल्ल्यासाठी पिस्तूल वापरण्यात आले. त्याच्या तपासणीचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून मिळालेला नाही. कोणत्याही घटनेत तपासाच्या दृष्टीने प्रत्यक्षदर्शी पुरावा सगळ््यात महत्त्वाचा दुवा असतो. मात्र नागरिकांकडून ठोस माहिती दिली जात नाही. त्याची काही कारणे शकतील, परंतु लोक पोलिसांना माहिती देण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. उमा पानसरेंना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. त्यांचा अजून पुरेसा जबाबही घेता आलेला नाही. पुणे, कोकण विभाग व परराज्यांतील पोलिसांचीही मदत आम्ही घेत आहोत. त्यामुळे खास तपास पथके (एसआयटी)आताही अस्तित्वात आहेत. सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्यास आमचा विरोध नाही. परंतु यापूर्वीच्या दोन खून प्रकरणांत सीबीआय चौकशीचे पुढे काय झाले, हे आपल्या सगळ््यांना ज्ञात आहेच, असेही ते म्हणाले.
आता तिसऱ्या खंडपीठाचा शोध
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या फौजदारी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयातील दोन खंडपीठांनी बुधवारी नकार दिला. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही जनहित याचिका केली होती. उच्च न्यायालयातील सध्याच्या कामकाज वाटपानुसार फौजदारी प्रकरणांच्या सुनावणीसाठी हीच दोन खंडपीठे आहेत. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींना स्वतंत्र खंडपीठ नेमावे लागेल. ते कोणाचे असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
तपासात अडचणी : पोलिसांनी हल्ला नेमका कसा झाला, त्याचे चित्रण करून ते उमातार्इंना टीव्हीवर दाखविले. मात्र त्यांना हल्लेखोर कोणत्या बाजूने आले याची माहितीही खात्रीपूर्वक देता आलेली नाही. अगोदरच्या माहितीबद्दल पुन्हा विचारणा केल्यावर त्यांच्याकडून विसंगत माहिती दिली जात आहे. पोलीस तपासास पूरक माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पानसरे हल्ला तपासात कोणतीच प्रगती नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ९ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ११ मार्चला मुंबईत डाव्या पुरोगामी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारची कोंडी होऊ शकते, हे लक्षात घेता स्वत: पोलीस महासंचालक घाईघाईने कोल्हापूरला आले.